मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मेट्रोच्या 2 ए आणि 7 या मार्गिकेच्या चाचण्यांचा आज (३१ मे) शुभारंभ झाला. यावेळी मुंबईतील आजचं ट्रॅफिक पाहून मुख्यमंत्री म्हणाले की, “गर्दी कमी झाली नाही तर मुंबईतील निर्बंध वाढवणार. मी कार्यक्रमाला येत असताना मुंबईची ट्रॅफिक पाहून अचंबित झालो. त्यामुळे काल जनतेशी संवाद साधताना चुकून निर्बंध उठवण्याची मी घोषणा केली काय असं वाटलं. त्यामुळे मी असं काही बोललो का याची काही जणांकडे चौकशी केली. पण मी तसं काही बोललो नसल्याचं लक्षात आलं. मी कोणतेही निर्बंध उठवलेले नाहीत. कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही. पण रहदारी अशीच वाढली आणि नागरिकांचा मुक्त संचार असाच सुरू राहिला तर निर्बंध कडक करावे लागतील”, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
‘आठवले’ तर सांगतो, मुख्यमंत्र्यांची मिश्किल टीका
यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना केंद्रातून राज्याला मदत मिळवून देण्याचं आवाहन केलं. रामदास आठवले हे माझे शेजारी आहेत. त्यांनी राज्यासाठी लागणारी मदत मिळवून देण्याकरीता केंद्रात प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. तुम्ही ती मदत कराच, पण अजून काही ‘आठवले’ तर अजून सांगतो, अशी कोटी मुख्यमंत्र्यांनी केली. त्यामुळे एकच हशा पिकला होता.
एमएमआरडीएच्या टीमचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
बऱ्याच दिवसानंतर मी प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित आहे. विकासाला वेग देणारा हा कार्यक्रम आहे. गेली वर्षभरही कार्यक्रम झाले. पण कोविड सेंटर उघडा, चाचणी केंद्राचं उद्घाटन करा, ऑक्सिजन प्लांट उघडा आदी कार्यक्रमच केली जात होती. दीड वर्षानंतर हा वेगळा कार्यक्रम होत आहे, असं सांगतानाच आताही आपण कोरोनाग्रस्त आहोत. कोरोना संपलेला नाही.
सर्व जग ठप्प झालेलं असताना, आयुष्य ठप्प झालेलं असताना कामाचा वेग मंदावला असेल पण तुम्ही काम थांबवू दिलं नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएच्या टीमचं कौतुक केलं. निर्बंध उठतील तेव्हा उठतील पण पूर्वीपेक्षा अधिक जोमानं काम करण्यासाठी आणि आयुष्य गतीमान करण्यासाठी ही कामं होत आहे, असंही ते म्हणाले.
दिल्लीत जाऊन मोदींना फक्त एवढं सांगा, अजित पवारांनी रामदास आठवलेंना केली विनंती
तुम्ही महाराष्ट्राला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा आता दिल्लीत जाऊन तुम्ही पंतप्रधान मोदी यांना भेटा आणि तौक्ते चक्रीवादळासाठी योग्य ती मदत महाराष्ट्राला द्या, असे सांगा. गुजरातने काहीच मागणी केली नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1000 कोटींची मदत जाहीर केली. पण महाराष्ट्राला केंद्राकडून कोणतीही मदत मिळालेली नाही, याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
केंद्रातील सरकारने आत्तापर्यंत राज्यांना मदत करताना इतका भेदभाव केला नव्हता
राज्यकर्ते हे येत आणि जात असतात. जनता त्यांना निवडून देत असते. मात्र, आजपर्यंत केंद्रात कोणाचेही सरकार असले तरी राज्यांना मदत देताना इतका भेदभाव झाला नव्हता किंवा तसे जाणवलेही नसेल. यामध्ये कितपत तथ्य आहे हे माहिती नाही पण याचा गोष्टीचा विचार होणे गरजेचे आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.
तौक्ते चक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही फटका, मोदींनी मदत करावी
पंतप्रधान मोदी तौक्ते चक्रीवादळानंतर प्रथम महाराष्ट्रात येणार होते. मात्र, नंतर त्यांच्या दौऱ्यात अचानक बदल झाला आणि ते गुजरातमध्ये गेले. त्याठिकाणी जाताच मोदींनी 1000 कोटींची मदत जाहीर केली. तशीच मदत महाराष्ट्रालाही मिळावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.