मुंबई। “..आम्ही जे करतो ते ‘बेस्ट’च करतो, आणि यापुढेही ‘बेस्ट’च करत राहू. मुंबईत आम्ही सगळ्यांना अभिमान वाटेल, अशी कामं करत आहोत. प्रवास हा विकासाचाही असायला हवा. त्या दृष्टीने आज जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून, मुंबईने करून दाखवलं आहे. लोकांच्या आयुष्यातही ईझ ऑफ लिव्हिंग आणण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (२५ एप्रिल) येथे सांगितले.
मुंबई महानगरपालिकेचा बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम – बेस्टच्या “नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड” – एनसीएमसीचे लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यात ते बोलत होते. बेस्टच्या कुलाबा आगारातील ईलेक्ट्रीकल हाऊसच्या प्रांगणात झालेल्या या सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री ॲड.अनिल परब, पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर मुंबई महानगर पालिकेचे प्रशासक आयुक्त इक्बालसिंह चहल, बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र, बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष आशिष चेंबुरकर आदी उपस्थित होते.
बेस्टने एनसीएमसी-कार्ड सुविधेच्या माध्यमातून भारतातील कुठल्याही महानगरात नसेल अशी सुविधा उपलब्ध करून दिल्याची अभिमानास्पद कामगिरी केल्याचे नमूद करून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, आज मी येथे बेस्टचं कौतुक करायला आलो आहे. आम्ही सगळ्यांना अभिमान वाटेल, अशी कामे करत आहोत. मी बेस्टच्या आयुष्याचाही प्रवास अनुभवला आहे. बेस्टचे अधिकारी, कर्मचारी नेहमीच पुढे चला.. पुढे चला म्हणूत अथकपणे लोकांच्या सेवेत असतात. कोरोनाच्या संकटातही एस.टी. आणि बेस्टने अलौकीक असे योगदान दिले आहे. माझा उल्लेख लोकप्रिय मुख्यमंत्री असा केला जातो. पण हे बिरुद माझ्या नावासमोर लागण्यासाठी माझ्या या कुटुंबातील तुम्हा सर्वांचे श्रेय आहे. तुम्ही मेहनतीने बेस्टचं, मुंबई महापालिकेच्या कामाचं एक मॉडेल उभे केले आहे. या कामांचे कौतुक उच्च, सर्वोच्च न्यायालय आणि न्यू यार्क टाईम्सनेही केले आहे. या कार्डच्या सुविधेच्या माध्यमातून मुंबईकरांची सुट्ट्या पैश्यांची कटकट दूर केली आहे. उद्योगांच्या ईझ ऑफ डुईंग प्रमाणेच आपण नागरिकांच्या ईझ ऑफ लिव्हिंगचा – आयुष्याचा विचार करत आहोत. शेवटी प्रवास हा विकासाचाही असायला हवा. त्यामध्ये आरोग्यासह, पर्यावरणाचाही विचार करत आहोत. प्रदूषण वाढते आहे, उष्णता वाढते अशी नुसती चर्चा करत नाही. तर त्यावर काम ही करत आहोत. त्यामुळेच पंतप्रधान कार्यालयाकडूनही आपल्या बस थांब्याच्या उपक्रमांची दखल घेतली गेली आहे. ज्यांच्या कष्टाच्या जीवावर, घामांवर केवळ राज्यच नव्हे, तर देशाची अर्थव्यवस्था उभी आहे. त्या मुंबईकरांसाठी आम्ही काम करत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
बेस्ट अनेक उपक्रमांत पहिल्या क्रमांकावर आहे. या उपक्रमासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही देऊन मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, बेस्टने अत्यंत माफक दरात उत्तम सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेनेही शिक्षण, आरोग्यात उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. मुंबईतील महापालिकेच्या शाळेचा दर्जा हा आता अन्य शाळांत शिकणाऱ्या मुंलाच्या पालकांसाठीही आकर्षण ठरू लागले आहे. मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या गणवेशातील मुलांना बेस्टच्या बसने मोफत प्रवास करण्याची मुभा आहे. यापुढे खासगी शाळांतील मुलांसाठीही कमी दरातील बस पास सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. अन्य शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या पालकांना जसे आपल्या मुलांनाही महापालिकेच्या जावे असे वाटू लागले आहे. असा या शाळांचा दर्जा आहे. त्याचप्रमाणे आता सर्वांना बेस्टने प्रवास करावे असे वाटेल. आम्ही जे करतो ते बेस्टच करतो, ते यापुढेही करत राहू. या जनतेसाठीच्या सेवेत ज्यांना-ज्यांना खासगी संस्थाना सेवा, ज्ञानाचे योगदान द्यायचे आहे, त्यांचे स्वागतच केले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या शालेय जीवनातील बेस्ट बस प्रवासाच्या आठवणींनाही उजाळा दिला.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, देशाच्या आर्थिक राजधानीत सार्वजनिक परिवहन व्यवस्थेसाठी अशी महत्त्वपूर्ण आणि चांगली सुविधा सुरू होते आहे, याचा विशेष आनंद आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून मुंबई मिळवली आहे. या मुंबईचे मुंबईपण टीकवून, येथील मराठीपण जपत मुंबईकराच्या श्रमाला मोल मिळालं पाहिजे, त्यांच्या कष्टानंच फळ मिळाले पाहिजे या दृष्टीने विकास केला जात आहे. मुंबईने घोडागाडी ते मेट्रो पर्यंतचा प्रवास पाहिला आहे. मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री या दोघांनीही या शहराच्या विकासासाठी नेहमीच आग्रही भूमिका घेतली आहे. ज्यांच्याकडे विकासाची दृष्टी आहे, अशा तरूणांनी लक्ष घातले तर काय होऊ शकते, हे मुंबईकर अनुभवत आहेत. मुंबईत रस्ते, मेट्रो, उड्डाण पुल अशी विविध विकास कामे, प्रकल्प सुरु आहेत. मुंबईच्या बेस्ट सेवाचा जागतिकस्तरावर उल्लेख केला जातो. या नव्या सुविधेमुळे नागरिकांना चांगली सुविधा मिळणार आहे. मुंबईत वरळी परिसरात जागतिकस्तरावरील पर्यटन प्रकल्प, मराठी भवन, जीएसटी भवन उभे राहत आहेत. त्याचप्रमाणे वांद्रे येथे देशातील सर्वोत्तम असे वसतिगृह उभे करण्यात येईल. ज्यामध्ये सारथी, महाज्योती आणि राज्यातील आर्थिकदृष्टी दुर्बळ स्तरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, पुढे चला हा मुंबईचा मंत्र आहे. हे पुढे चला देशभर नाही, तर जगभर घेऊन चालेल असा प्रयत्न आहे. “नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड” – एनसीएमसी ही सुविधा उपलब्ध करून देणारा “बेस्ट” हा भारतातील पहिला सार्वजनिक परिवहन उपक्रम आहे. बेस्टने मुंबईकरांना अविरतपणे सेवा दिली आहे. संकट कुठलेही असो, बेस्ट लोकांच्या सेवेसाठी रस्त्यावर धावत राहिली आहे. कोरोनाच्या काळातही बेस्ट धावत होती. जगातील सर्वात स्वस्त आणि मस्त असा बेस्टचा लौकीक आहे. कमीत कमी तिकीट दरात, उत्कृष्ट बस सेवा देणारी आपली बेस्टच आहे. बेस्ट हा उपक्रम नावाप्रमाणे बेस्ट आहे. परिवहन आणि वीजेचा पुरवठा ही सर्व कामे बेस्ट उत्कृष्टरित्या करत आहे. सात लाख वीज ग्राहकांना ई-बिल्स दिली जात आहेत. शहरातील ४५० मार्गांवर बेस्ट धावते, हे कौतुकास्पद आहे. त्याबाबत लंडनच्या महापौरांनीही कौतुक केले आहे. हरित थांबे, सौर ऊर्जा छतांचे थांबे असे मेड इन मुंबई असे उपक्रम आम्ही राबवत आहोत. मुंबईतील नागरिक आणि येथे येणाऱ्या पर्यटकांना उत्कृष्ट सुविधा आणि सेवा देण्याचा प्रयत्न आहे. यासाठी बेस्टच्या ताफ्यात ई बसेसची संख्या वाढविण्यात येत आहे. येत्या काही वर्षात बेस्टच्या ताफ्यात दहा हजार बसेस असतील. त्यामध्ये डबल डेकर बसेसचाही समावेश असेल. मुंबईत मेट्रोचे जाळ्याचा विकास करत आहोत. पण रस्तेमार्गांनी आणि जास्तीत जास्त नागरिकांना सेवा देण्याचा प्रयत्न आहे. मोफत आणि दर्जेदार शिक्षणासोबतच महापालिकेच्या शाळांतील मुलांना मोफत बस सेवा देणारी बेस्ट हा एकमेव आहे. या कार्डच्या रुपाने आपण मुंबईकरासाठीची वचनपूर्ती केली आहे.
या सोहळ्यात बेस्ट कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युईटीच्या ४८३ कोटी रुपयांच्या निधीचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते कळ दाबून डिजिटली वितरण करण्यात आले. बेस्टचे महाव्यवस्थापक चंद्रा यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते एनसीएमसी कार्डचे अनावरणाद्वारे लोकार्पण करण्यात आले. बेस्टच्या व्हिजन डॉक्युमेंटचेही प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्यास महापालिका, बेस्ट उपक्रमाचे अधिकारी, कर्माचाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.