HW News Marathi
Covid-19

रखडलेल्या MPSC नियुक्त्यांमुळे युवा पिढी नैराश्यात ! रोहित पवारांचे सरकारला पत्र

पुणे । MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने निराश होऊन पुण्यात एका २४ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्वप्नील लोणकर असे या तरुणाचे नाव असून या वृत्ताने महाराष्ट्र हादरला आहे. दरम्यान, “स्वप्नीलच्या आत्महत्येला जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल देखील आता सर्वत्र उपस्थित केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी तातडीने राज्य सरकारकडे MPSC परीक्षा आणि नियुक्त्यांबाबत एक निवेदन दिले आहे.

रोहित पवारांनी MPSC परीक्षा त्वरित घेण्याबाबत तसेच प्रलंबित नियुक्त्यांबाबत त्वरित निर्णय घेण्याची मागणी करणारे निवेदन दिले आहे. याविषयी ट्विट करताना रोहित पवार म्हणाले की, “कोरोनामुळे स्थगित केलेली MPSC परीक्षा आणि प्रलंबित निकाल व रखडलेल्या नियुक्त्यांमुळे युवा पिढी नैराश्यात आहे. माझी राज्य सरकारला विनंती आहे की, आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन MPSC परीक्षा त्वरित घेण्यात यावी. तसेच प्रलंबित नियुक्त्याही तातडीने देण्यात याव्यात”, अशी मागणी रोहित पवार यांनी सरकारकडे केली आहे.

 

पुण्यात एका MPSC उत्तीर्ण तरुणाची आत्महत्या ! नोकरी न मिळाल्याचा होता तणाव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “स्वप्निल सुनील लोणकर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो फुरसुंगी इथला राहणारा आहे. स्वप्निलच्या वडिलांची शनिवार पेठेत प्रिंटींग प्रेस आहे. बुधवारी नेहमीप्रमाणे स्वप्नीलचे आई-वडील प्रेसमध्ये गेले होते. तर स्वप्निलची बहिण बाहेर गेली होती. दुपारी घरी येऊन स्वप्निल कुठेच दिसत नसल्याचे पाहून त्याच्या बहिणीने त्याच्या खोलीत जाऊन पाहिले. यावेळी स्वप्निलने गळफास घेतल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती बहिणीने तातडीने आई वडिलांना दिली. त्यानंतर लगेचच स्वप्निलला जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी स्वप्नीलला मृत घोषित केले. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे हडपसर पोलिसांनी सांगितले.”

२०१९ साली झालेल्या MPSCच्या पूर्व व मुख्य परीक्षांमध्ये स्वप्नील उत्तीर्ण झाला होता. मात्र, कोरोनास्थितीमुळे दीड वर्षांपासून मुलाखत झालेली नव्हती. तसेच त्याने २०२० मध्येही पू्र्व परीक्षा दिली. त्यामध्येही तो उत्तीर्ण झाला. विविध जिल्ह्यातील निर्बंधामुळे मुख्य परीक्षा झालेली नाही. या तणावातूनच आपण आत्महत्या केल्याचे स्वप्निलने आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. स्वप्नील आपले अभियांत्रिकीचे शिक्षण देखील पूर्ण केल्यानंतर MPSC परीक्षेची तयारी करत होता. आता अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या या तरुणाच्या आत्महत्येला नेमकं कोण जबाबदार ? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरोग्यमंत्री राजेश टोपे आज पुण्यातील NIV आणि नायडू हॅास्पिटलला भेट देणार

Arati More

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

देशाचा आकडा ३१ हजारांच्याही पुढे, तर, २४ तासांत ७१ जणांचा मृत्यू

News Desk