HW Marathi
मुंबई

पडसलगीकरांना पुन्हा मुदतवाढ नाही, मुंबईच्या नवीन सीपी पदी परमबीर की बर्वे ?

मुंबई । देशातील प्रतिष्ठेचे मानले जाणारे मुंबई पोलीस महासंचालक पदाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. दत्ता पडसलगीकर यांना आणखी दोन वर्षे मुदतवाढ मिळावी. यासाठी राज्य सरकारने पाठवलेला प्रस्ताव केंद्राने फेटाळून लावला आहे. त्यामुळे पडसलगीकर २८ फेब्रुवारीलाच निवृत्त होतील. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्‍तपदासाठी परमबीर सिंग आणि संजय बर्वे हे दोघे या शर्यतीत आहेत. सध्या मुंबई पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळत आहेत.

कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्‍त पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक संजय बर्वे, पुण्याचे पोलीस आयुक्‍त के. व्यंकटेशम आणि ठाण्याचे पोलीस आयुक्‍त विवेक फणसळकर ही चार नावे सध्या मुंबई पोलीस आयुक्‍तपदासाठी चर्चेत असून परमबीर सिंग आणि संजय बर्वे यांच्यापैकी एकाची या पदावर वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पडसलगीकर गेल्या वर्षीच्या ३१ऑगस्टमध्ये निवृत्त होणार होते. त्यांना आणखी दोन वर्षांची मुदतवाढ मिळावी, अशी विनंती फडणवीस यांनी केंद्राला केली होती. परंतु पडसलगीकर यांना केवळ ३ महिन्यांचीच मुदतवाढ मिळाली. ती संपल्यानंतर पुन्हा मुदतवाढ मागण्यात आली त्यावेळी पडसलगीकर यांना आणखी ३ महिन्यांचा कालावधी देण्यात आला. मात्र पडसलगीकर यांना दुसर्‍यांदा मुदतवाढ देण्यात आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात याविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली.

मुख्यमंत्री पडसलगीकर यांची बाजू घेतात, असा आरोप या याचिकेत करण्यात आला होता. ही याचिका फेटाळण्यात आली खरी पण केंद्र पडसलगीकरांच्या आणखी मुदतवाढीसाठी तयार आहे का, अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली होती. त्यानंतर पडसलगीकरांना आणखी मुदतवाढ मिळणार नाही, असे राज्य सरकारला बुधवारी (६ फेब्रुवारी) कळवण्यात आले. त्यानंतर पोलीस महासंचालक पदासाठी सरकारने नावे कळवली आहेत. सुबोध जैस्वाल २०२२ मध्ये निवृत्त होतील. ते पोलीस दलात सध्या सर्वात वरिष्ठ दर्जाचे अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांची वर्णी या पदावर लागू शकते.

परमबीर सिंग आणि संजय बर्वे गेल्यावेळीदेखील मुंबई पोलीस आयुक्‍त पदाच्या शर्यतीत होते.  त्यावेळी सुबोध जैस्वाल यांची नियुक्‍ती झाली होती. परमबीर सिंग १९८८च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. यापूर्वी ते ठाण्याच्या पोलीस आयुक्‍तपदी कार्यरत होते. तर संजय बर्वे राज्य सुरक्षा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकपद सांभाळत होते. त्यानंतर त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी आणण्यात आले होते.

Related posts

दांडीबहाद्दर विद्यार्थ्यांना ‘आयडॉल’चा दिलासा

News Desk

निवडणुक खर्चावर मर्यादा

News Desk

प्रत्यारोपणासाठी ‘यकृताचा’ ठाणे ते दादर लोकलप्रवास

News Desk