HW News Marathi
मुंबई

ST Strike: वकील गुणरत्न सदावर्ते किला कोर्टात दाखल

मुंबई | ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी शुक्रवारी, ८ एप्रिल रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी चप्पल व दगडफेक केली. त्यानंतरही या आंदोलनाचा तिढा काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे. एसटी आंदोलनाच्या घटनेमुळे आता राज्यच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे. याच प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून म्हणजेच ज्यांनी हे आंदोलकांना भडकवलं असा आरोप वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून नुकतंच त्यांना मुंबईच्या किला कोर्टात दाखल करण्यात आलं आहे. 

 गुणरत्न सदावर्ते यांच्या चिथावणीखोर भाषणानंतर एसटी कर्मचारी आक्रमक झाले असा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्रीच मुंबईतील गावदेवी पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेतलं होतं. मध्यरात्री तब्बल 4 तास त्यांची मेडिकल तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर ज्या १०७ आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे त्यांना सुद्धा कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्या १०७ आंदोलकांसह पोलीस कोर्टाकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली असून आज किला कोर्टात त्यांच्यावर सुनावणी सुरू आहे. मात्र, त्यांना कोणतीही नोटीस न देता घरातून नेलं असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच माझी हत्या होऊ शकते, असा खळबळजनक दावा त्यांनी केला असून त्यांच्या हत्येसाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील जबाबदार असतील, असं वक्तव्य काल सदावर्तेंनी केलं होतं.

खरंतर गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचा संप चालूच आहे. आज (शनिवार, ९ एप्रिल) सुद्धा एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. आज सकाळपासूनच एसटी कामगारांनी आपला मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक येथे वळवला होता. दरम्यान, मात्र, कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं आहे की पोलिसांनी त्यांना आझाद मैदानातून हटवलं आणि त्यामुळे ते सीएसएमटी रेल्वे स्थानकावर दाखल झाले.

शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या १०७ कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. मुंबईतील गावदेवी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात हिंसाचाराचा कट रचणे आणि दंगलीशी संबंधित परिस्थिती निर्माण करणे आदी कलमे लावण्यात आली आहेत. अटकेनंतर या सर्वांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

Related posts

एसएनडीटी लैंगिक अत्याचार प्रकरणी वॉर्डन निलंबित

News Desk

शेअर बाजारात मोठी घसरण

swarit

आज पुन्हा मध्य रेल्वेचा खोळंबा, खडवली स्थानकाजवळ रुळाला तडे

News Desk