HW News Marathi
देश / विदेश

आधी रुग्णालय आणि नंतर संसद भवन उभे करावे, खासदार अमोल कोल्हेंनी राष्ट्रपतींना सुनावले

नवी दिल्ली | राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नव्या संसद भवनाच्या उभारणीवरुन राष्ट्रपतींना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुनावले आहे. लोकसभेत बोलताना त्यांनी आधी देशाची प्राथमिक गरज लक्षात घेत सुसज्ज रुग्णालय उभारावे आणि नंतर नव्या संसद भवनाची उभारणी करण्याचे आत्मचितंन करावे असा सल्लाही दिला आहे. अमोल कोल्हे यांनी फेसबूक पोस्ट करत देखील याची माहिती दिली आहे.

काय आहे फेसबूक पोस्ट?

लोकसभेत सोमवारी रात्री माननीय राष्ट्रपती महोदयांच्या अभिभाषणावर Nationalist Congress Party – NCP च्या वतीने भाषण केले.यावेळी अभिभाषणात नमूद विविध मुद्यांवर मत मांडले.विशेषत: शेतकरी प्रश्नावर सन्मानजनक तोडगा काढण्यासाठी सरकारने पुढे यावे असे आवाहन केले. माननीय राष्ट्रपती महोदयांनी आपल्या अभिभाषणात केंद्र सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख केला.या योजनांचा लाभ जर तळागाळातील लोकांना झाला असेल तर मी या सरकारचे अभिनंदन करतो. राष्ट्रपती महोदयांनी आपल्या अभिभाषणात नव्या संसद भवनाचे निर्माण करण्याबाबत उल्लेख केला.

परंतु ज्या देशाची सार्वजनिक आरोग्यव्यवस्था कमकुवत असल्याचे कोरोनासारख्या महामारीने पुर्णतः उघड झाले असेल त्या देशाचे प्राधान्य काय असायला हवे ? सध्या गरज लोकसभा मतदारसंघ, जिल्ह्यात सुसज्ज असे सार्वजनिक रुग्णालय उभारण्याची गरज आहे.

या सरकारला विनंती आहे की,देशाच्या आरोग्यव्यवस्थेची स्थिती पाहता अगोदर रुग्णालये आणि मग संसद भवन यावर आत्मचिंतन करावे. असंही या संसद भवनाची मागणी कुणीही केलेली नाही परंतु ज्या निधीची मागणी सर्वजण करीत आहेत तो खासदार निधी तातडीने पुर्ववत केला जावा अशी माझी या सरकारला मागणी आहे.

राष्ट्रपती महोदयांनी केंद्र आणि राज्य सरकारांमधील परस्परसंबंध व समन्वयाचा मुद्दा देखील मांडण्यात आला. माझी केंद्र सरकारला विनंती आहे की, महाराष्ट्र सरकारच्या हक्काची, जीएसटीच्या परताव्याची सुमारे २५ हजार कोटी रुपये केंद्राकडून येणे बाकी आहे,ही रक्कम तातडीने देण्यात यावी. या सरकारने देशातील दोन कोटी तरुणांना दरवर्षी रोजगार देण्याचे एक स्वप्न दाखविले होते.पण रोजगार मिळायचे लांबच राहिले जे हातातलं होतं ते देखील निसटून गेलं अशी स्थिती आहे. हजार जागांसाठी लाखो तरुण अर्ज करतात. चतुर्थश्रेणीच्या जागांसाठी ग्रॅज्युएट-पोस्टग्रॅज्युएट तरुण रांगेत उभे आहेत.

‘नीम’ आणि ‘नॅशनल अप्राईंटिस’ यांसारखी धोरणे देशातील तरुणांसाठी शोषणव्यवस्था ठरली आहे.मुलांना नोकरी लागली की त्यांची लग्ने होतात आणि त्यानंतर त्याला कायम करायला नको म्हणून वर्ष-दोन वर्षांत कंपनी ब्रेक देते.यामुळे त्या तरुणांचे भविष्य अंधःकारमय होते. त्यामुळे या तरुणांचा आक्रोश समजून घ्या आणि या धोरणांचा पुनर्विचार करावा अशी माझी सरकारला नम्र विनंती आहे.या अभिभाषणात आम्हाला आत्मनिर्भर भारत हा एक चांगला शब्द ऐकायला मिळाला.जेंव्हा आम्ही सर्वांनी देश को बिकने नहीं दूँगा हे ऐकले होते तेंव्हा आम्हाला अभिमान वाटला होता.

पण त्यानंतर मात्र ओएलएक्सची जाहिरात जास्तच प्रभावी झाली आणि ती धोरणांतही दिसू लागली. जे आहे ते विकून टाकण्याचा सपाटा या सरकारने लावला.त्यामुळे आता भीती वाटतेय की हे सरकार आत्मनिर्भर भारताची उभारणी करतंय की ‘मुठभर पुँजीपतीनिर्भर’ भारताची? मी या सरकारला सांगू इच्छितो की, जर अशा प्रकारे मुक्त अर्थव्यवस्थेच्या पदराआड लपून केंद्र सरकार सत्तेच्या मागे-पुढे करणाऱ्या मुठभर भांडवलदारांना या देशाची संपत्ती विकून टाकणार असेल तर भावी पिढ्या आपल्याला कधीही माफ करणार नाहीत.

शेतकऱ्यांसाठीच्या योजनांबद्दल बोलण्यात आले.परंतु गेली तीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करीत शहीद झालेल्या २०० भारतीयांचा,हो मी त्यांना जाणीवपूर्वक भारतीयच म्हणतोय, त्यांचा उल्लेख देखील नसावा,त्यांच्याप्रती किंचितही संवेदना या अभिभाषणात नमूद नसावी ही आश्चर्यजनक बाब आहे.प्रजासत्ताक दिनी जी घटना घडली त्याचा निषेध करण्यात आला. हिंसेचे कसलेही समर्थन होऊ शकत नाही ना केले जाऊ शकते. परंतु या माध्यमातून शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा जो कट रचण्यात आला तो अतिशय निषेधार्ह आहे.

अगोदर सांगण्यात आलं की हे पंजाबचे शेतकरी आहेत, नंतर सांगण्यात आलं की ते आडते आहेत, नंतर सांगण्यात आलं की ते खलिस्तानी आहेत.त्यानंतर तथाकथित आयटी सेल आणि मिडियातील काहींनी त्यांना देशद्रोही घोषीत करुन टाकले.पण जो बाप आपल्या अठरा वर्षांच्या मुलाला सांगतो की उठ,तुला लष्करात भरती व्हायचंय,जी आई आपल्या मुलाला सांगते की जर देशावर शत्रुची गोळी आली तर तुला तुझी छाती पुढे करायची आहे, तर हा असा बाप,आई देशद्रोही कसे असू शकतात.मुलगा आज उणे अंश सेल्सिअस तापमानात सियाचीनमध्ये कर्तव्यावर आहे,त्याचवेळी त्याचा ७० वर्षांचा म्हातारा बाप कडाक्याच्या थंडीत दिल्लीच्या सीमांवर आपल्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करतोय.या अशा परिस्थितीत ‘जय जवान,जय किसान’ कसं म्हणायचं?

आजतर देशाला दोन नवे शब्द मिळाले आहेत,त्यातला एक आहे आंदोलनजीवी. मी या शब्दाबद्दल अतिशय आभारी आहे.कारण महाराष्ट्रातील भाजपाचे नेते उठसूठ आंदोलन करीत होते,त्यांना काय म्हणायचं हे आम्हाला या शब्दामुळे समजलं.पण ज्या कष्टकरी वर्गासाठी बाबा आढाव वयाच्या नव्वदीतही ठामपणे उभे राहतात ते मात्र महाराष्ट्राचा अभिमान आहेत.ज्या देशाच्या स्वातंत्र्याचा पायाच आंदोलन आहे त्या देशात या शब्दाचा प्रयोग कसा काय केला जाऊ शकतो.

या सभागृहात काही सदस्यांनी परदेशातील लोकांनी आपल्याबद्दल काय गौरवोद्गार काढले हे अभिमानाने सांगितलं.ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष संजीवनी म्हणतील तर आम्ही खुश होऊ,अमेरिकेचे माजी अध्यक्ष ‘हाऊडी मोदी’ म्हणतील तर आम्ही टाळ्या वाजवू.पण एखादा परदेशी व्यक्ती मानवतावादी दृष्टीकोनातून शेतकरी आंदोलनाच्या बाबतीत एखादी टिपण्णी करीत असेल तर ती फॉरेन रिस्टक्टीव्ह आयडॉलॉजी होते ! हे बॅरीकेडस् लावणे, तटबंदी उभारणे, रस्त्यावर खिळे ठोकणे हे कोणत्या लोकशाहीचे लक्षण आहे ?

राष्ट्रपती महोदयांनी आपल्या अभिभाषणात चाणक्याची वचने उद्धृत केली आहेत.पण मी या सभागृहाला सांगू इच्छितो की याच आर्य चाणक्यांनी असंही म्हटलं आहे की,जेंव्हा राजाचा अहंकार प्रजेच्या हितापेक्षा मोठा होतो तेंव्हा समजून जा की त्याच्या शासनकाळाचा अंत होणार हे निश्चित आहे. यामुळेच माझी या सरकारला विनंती आहे की, शेतकरी आंदोलनावर शांततेच्या मार्गाने तोडगा काढा. तरच आपण म्हणू शकू ‘जय जवान,जय किसान’.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप आमदारांची राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला मारहाणीनंतर माफीनामा

News Desk

संख्याबळाची चिंता नको, विरोधकांचा शब्द आमच्यासाठी महत्वाचा !

News Desk

चिनी सैन्यांची लडाखमध्ये घुसखोरी झाली नाही | भारतीय सैन्य

News Desk