HW News Marathi
देश / विदेश

WomensDay2019 : स्वतःसाठी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या ‘या’ महिलांचा प्रेरणादायी प्रवास

मुंबई | आज जागतिक महिला दिन. खरे पाहायला गेले तर महिलांना आपण पुरुषांच्या बरोबरीच्या आहोत हे सिद्ध करण्याची मुळातच गरज नाही. ते वेळोवेळी सिद्ध झालेच आहे, हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही. महिलांची स्पर्धा जर कुणाशी असेल तर ती फक्त आणि फक्त स्वतःशी आहे. आजची स्त्री ही समाजाने आखून दिलेल्या जाचक चौकटींच्या बाहेर पडली आहे, पडण्याचा प्रयत्न करत आहे. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही आपल्याला अशा काही महिलांची ओळख करून देणार आहोत ज्यांनी समाजाने आखून दिलेल्या तथाकथित चौकटीच्या बाहेर जाऊन आपले स्वतंत्र विश्व निर्माण केले, आपले स्वप्न पूर्ण केले. ज्या असंख्य अडचणींच्यासमोर जमिनीत पाय घट्ट रोवून स्वतःसाठी, स्वतःच्या स्वप्नांसाठी खंबीरपणे उभ्या राहिल्या.

पुरुषांची मक्तेदारी मोडून तीने जपली लोककला

डोक्यावर भरजरी फेटा, कपाळी चंद्रकोर, करारी नजर आणि आपल्या पहाडी आवाजासह संपूर्ण व्यासपीठावर आपली हुकूमत गाजवत पोवाडा सादर करणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या लोकशाहीर सीमा पाटील यांना ऐकून अंगावर शहारे आले नाहीत तर नवलच. पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या एका क्षेत्रात एखादी स्त्री जेव्हा पदार्पण करते तेव्हा निश्चितच तिला अनेक आव्हानांचा, अडचणींचा सामना करावा लागत असतो. पण ती स्त्री या सर्व अडचणी-आव्हानांचा सामना करीत, प्रवाहविरुद्ध जाण्याची हिंमत दाखवते आणि त्या क्षेत्रात आपला ठसा उमटवीते. याचे अत्यंत आदर्श उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील पहिल्या महिला लोकशाहीर सीमा पाटील होय.

लोककला जपणाऱ्या लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे

सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी महाराष्ट्राची लोककला लावणीच्या माध्यमातून जपणाऱ्या ज्येष्ठ कलावंत मंगला बनसोडे यांनी नवरात्री निमित्त एच.डब्ल्यू.मराठीशी खास बातचीत केली आहे. बालपण, शिक्षण आणि कला याविषयी त्यांनी विशेष बातचीत केली आहे. वयाच्या ७ व्या वर्षी आई लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंगला यांनी तमाशाच्या बोर्डावर नाचायला सुरुवात केली. आज वय वर्षे ६७ असतानाही त्या तितक्याच उत्साहात लावणी करताना पाहायला मिळतात. मंगला बनसोडे यांची या कलाक्षेत्रात ५ वी पिढी आहे. तसेच खानदानात राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आलेल्या मंगला बनसोडे या ३ ऱ्या कलाकार आहेत. मंगला बनसोडे या ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायण गावकर यांच्या कन्या तर वगनाट्यकार आर एल बनसोडे यांच्या पत्नी आहेत.

अंधत्वावर मात करत ‘ती’ वाजविते ६० प्रकारची वाद्ये

समाजत अनेक असे अंध, दिव्यांग लोक राहतात. त्यांपैकी काही जण अंधत्वामुळे खचून जातात, तर काही जण जिद्दीने विशेष अशी कामगिरी करून दाखवतात. ज्याने समाजाला प्रेरणा मिळते. अशीच विशेष कामगिरी करणाऱ्या योगिता तांबे या अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेत. योगिता तांबे या मुंबईत जोगेश्वरीमध्ये राहतात. सध्या त्या जोगेश्वरीमधील अस्मिता शाळेमध्ये संगीत शिकवतात. महत्त्वाची बाब म्हणजे त्या अंध असून ६० ते ६५ प्रकारची वाद्य वाजवता.

व्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी ‘ती’ची लढाई

आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाच्या समस्या आपल्याला पूर्णपणे माहित असतात. पण काही जण त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. तर काही जण त्या समस्या सोडविण्यासाठी आपले संपूर्ण जीवन खर्ची घालतात. आपल्या समाजाची अशीच एक मोठी समस्या म्हणजे व्यसनाधीनता. आपल्या समाजातील तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण सर्वाधिक आहे. उद्याचा समाज कसा असेल हे जर पाहायचे असेल तर त्या समाजातील तरुणांकडे पहा, असे म्हटले जाते. एवढी मोठी जबाबदारी तरुणांच्या खांद्यावर असताना त्याच तरुणांनी असे नशेच्या आहारी जाऊन कसे चालेल ? म्हणूनच ही स्थिती बदलण्यासाठी मुंबईत वास्तव्यास असलेल्या वर्षा विद्या विलास या समाजातील नशामुक्तीच्या प्रश्नावर काम करीत आहेत.

मुंबईतील पहिली महिला टॅक्सी चालक संगीता वंजारे

पैसा मिळवून देणाऱ्या जवळपास प्रत्येक कामात पुरुषांचीच मक्तेदारी पाहायला मिळते. काही कामे तर खास पुरुषांचीच, मग पुरुषांचेच म्हणून ओळखले जाणारे एखादे काम एखादी स्त्री जेव्हा पहिल्यांदा करते, तेव्हा सर्व समाजाच्या भुवया उंचावतात. अनेक लोक अशा स्त्रीला नावेही ठेवतात. ‘हे काम तर माणसांचं आणि या बयेला काय दुसरं कामंच मिळालं नव्हतं’, असा सल्लावजा प्रश्नही लोकांतून केला जातो. पण मूळ कोल्हापूरच्या असणाऱ्या पण मुंबईत राहणाऱ्या या महिलेने परिस्थितीवर मात करत. महिलांसमोर एक नवीन आदर्श ठेवला आहे. महिला देखील कोणत्या क्षेत्रात कमी नाहीत. मुंबई्च्या लोअर परळ येथील मध्यमवर्गीय कुटुंबात राहणाऱ्या संगीता राजू वंजारे या मुंबईतील पहिल्या महिला टॅक्सी चालक आहेत.

Mandeshi Foundation संस्थापिका चेतना सिंन्हा यांची खास मुलाखत

माणदेशी फाउंडेशनच्या संस्थापिका चेतना सिन्हा यांनी साताऱ्यातील माण सारख्या दुष्काळी भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचे खूप मोठे काम केले आहे. माणदेशी फाउंडेशनच्या माध्यमातून लाखो महिलांना रोजगाराचं प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामुळे आज लिहिता वाचता न येणाऱ्या महिलासुद्धा पुढे येऊन हिंमतीने आपला व्यवसाय करीत आहे. याचाच एक भाग म्हणून नुकतेच मुंबईमध्ये माणदेशी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, यादरम्यान हजारो माणदेशी महिला आपल्या हाताने बनवलेल्या वस्तू घेऊन मुंबईत दाखल झाल्या होत्या. चेतना सिन्हा यांनी सांगितला आहे माणदेशी फाउंडेशनच्या उभारणीचा आपला प्रवास…

महिला उद्योगिनींचे प्रेरणास्थान, मीनल मोहाडीकर

आम्ही उद्योगिनी ही महिलांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी प्रेरणा देणारी संस्था आहे. संस्थेच्या वतीने मुंबईतील विविध उपनगरांत तसेच नवी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, रत्नागिरीसह, गोवा व दुबईतही महिला उद्योजकांच्या शाखा विस्तारित झाल्या आहेत. त्यामुळे समाजामध्ये महिलासांठी प्रेरणादायी काम करणारे ‘आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान’ महिलांसाठी प्रेरक ठरले आहे. ‘जिद्द तुमची, साथ आमची.. आम्ही उद्योगिनी’ हे संस्थेचे घोषवाक्य आहे. लाखो महिलांना स्वबळावर उद्योजक होण्याचे सामर्थ्य देणारी संस्था आहे. संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष असलेल्या मीनल मोहाडीकर यांनी नवरात्रोत्सवानिमित्त एच.डब्ल्यू. मराठी शी केलेली ही खास बातचीत…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची बैठक, ममता बॅनर्जींची अनुपस्थिती

News Desk

इंडोनेशियात आता ज्वालामुखीचा उद्रेक

Gauri Tilekar

कुमारस्वामी सरकारला १८ जुलैला बहुमत सिद्ध करावे लागणार

News Desk