Site icon HW News Marathi

“अनुराग ठाकूरजी आमची KDMC फक्त सेटिंगमध्ये स्मार्ट…”, मनसे आमदार राजू पाटलांचा टोला

मुंबई | भाजपचे नेते आणि केंद्रीय प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) रविवारपासून कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघाच्या  दौऱ्यावर आहेत. ठाकूर यांच्या दौऱ्याचा आज (13 सप्टेंबर) शेवटचा दिवस आहे. तर ठाकूर हे काल (१२ सप्टेंबर) कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या मुख्यालयात आयुक्तांसह पालिका अधिकाऱ्यांची भेट घेत विकास कामांचा आढावा घेतला. तसेच ठाकूरांनी स्मार्ट सिटी येथील कंट्रोल रूमला सुद्धा भेट दिली. त्याबरोबर, ठाकूरांनी कल्याण-डोंबिवलीच्या रस्त्यांची दुरवस्थेबाबत नाराजी व्यक्त करत आयुक्तांना खडेबोल सुनावले.

दरम्यान, रस्त्यांच्या मुद्द्यावरून कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीट अकाऊंटवरून एक ट्वीट घरचा आहेर दिला आहे. त्या ट्वीटच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना चिमटा काढला. या राजू पाटील ट्वीट करत म्हणाले, “हे शहर स्मार्ट सिटीमध्ये आहे का? हे ऐकून मी आश्चर्यचकीतच झालो, रस्ते पण खराब आहेत… केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे आयुक्तांना खडे बोल… अनुराग ठाकूरजी, आमची #KDMC फक्त सेटींगमध्ये स्मार्ट आहे. मग ती टक्केवारीची असो की नवनवीन पुरस्कार असो….बरं झाले आपणच घरचा आहेर दिला”, असे त्यांनी ट्वीट करत त्यांनी घरचा आहेर दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. ठाकूरांचा हा दौरा जाहीर होताच श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला धोका असल्याचा राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या होत्या. यावर ठाकूरांनी  प्रतिक्रिया देत म्हणाले, “कल्याण लोकसभा मतदारसंघात आमच्या मित्रपक्षाचे खासदार आहेत. आम्ही भाजपला बळकटी देण्याचे कार्य आम्ही करत आहोत. त्याचा एक भाग म्हणून मी कल्याण-डोंबिवली दौऱ्यावर आलो आहे. या मतदारसंघावर दावा करण्याचा भाजपचा हेतू नाही”, असेही यावेळी त्यांनी अवर्जून स्पष्ट केले. ठाकूरांनी शिंदेंच्या निवासस्थानी मोदकाचा आस्वाद घेतला. आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणत प्रसाद मिळाल्याचे सांगितले.

Exit mobile version