HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

“लवकरच मुंबई पालिकेसह विधानसभा निवडणुका घ्याव्यात” – उद्धव ठाकरे

मुंबई। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बहुप्रतिक्षित मुलाखतीचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे. या मुलाखतीच्या पहिल्या भागात उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांपासून विरोधक भाजपपर्यंत सर्वांवर टीकेची तोफ डागली. मात्र आता या दुसऱ्या भागात उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं असताना आता दुसरा भाग देखील जनतेसमोर आला आहे. या भागात उद्धव ठाकरेंनी विविध महत्त्वाच्या मुद्यांवर भाष्य केलं आहे. तसेच मुंबई पालिकेसह राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकांसंबंधित देखील मोठं विधान केलं आहे.

शिवसेनेतील अंतर्गत वाद बंडखोर आमदारांच्या भूमिकेमुळे चव्हाट्यावर आला आहे. राज्यातील हा अभूतपूर्व बंड आणि सत्तानाट्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रथमच मुलाखत दिली आहे. जरी उद्धव ठाकरेंनी ही मुलाखत शिवसेनेचंच मुखपत्र असलेल्या ‘सामना’ला ही मुलाखत दिली असली तरी राज्याच्या राजकारणासाठी ही मुलाखत महत्त्वाची मानली जात आहे. शिंदे गटातील आक्रमक बंडानंतर उद्धव ठाकरेंना एकावर एक धक्के अजूनही बसत आहेत. त्या दृष्टीने ही मुलाखत महत्त्वाची मानली जात आहे. तर दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक व खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या या मुलाखतीत राऊतांनी एक सवाल असा केला की “तुम्ही अडीच वर्ष कारभार केला आहे. मात्र, आताच्या नव्या सरकारकडे तुम्ही कसं पाहता?” त्यावर ठाकरे म्हणाले की, “आता सरकार स्थापन झालं आहे, त्यामुळे आता त्यावर बोलण्यात काही अर्थ नाही आहे.” त्यानंतर राऊत म्हणतात की “अजून सरकार स्थापन झालं नाही”. यापुढे उद्धव ठाकरे म्हणतात की, ‘हम दो एक कमरे में बंद हो और चाबी खो जाए’ असं हे सरकार आहे. आता वरून जेव्हा चावी उघडतील तेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असा टोला ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपला लगावला आहे.

तर १६ आमदारांच्या अपात्रेविषयी बोलताना ठाकरे म्हणाले की हे प्रकरण आता कोर्टात असल्यामुळे आता मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. अनेक घटनातज्ञांच्या मताप्रमाणे काय होणार हे आता सर्वांनाच ठाऊक आहे. कारण कायद्यामध्ये हे स्पष्ट सांगितले आहे, त्यामुळे घटनाबाह्य कृत्य करण्याची आपल्या देशात कोणाच्यात हिंमत असेल असं मला वाटत नाही, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे.

‘माझ्यावरचा राग मुंबईवर काढू नका’

दरम्यान आधीच्या सरकारने म्हणजेच महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांना स्थगिती किंवा रद्द करण्यात आले, ज्यातील ठाकरे सरकारने घेतलेला मुंबईतील महत्त्वाचा निर्णय म्हणजे ‘आरेतील मेट्रो कारशेड’. यावर ठाकरे म्हणाले की नव्या सरकारनं निर्णयांना स्थगिती देण्याची घाई केलेली आहे. माझ्यावरचा राग तुम्ही मुंबईवर काढू नका, मुंबईच्या पर्यावरणाला घात होईल असं काही करू नका. तिकडे झाडांची कत्तल केल्यानंतरही बिबट्यांचा वावर आहे, तिथं आजही वन्यजीव आहे. त्याउलट कांजूरमध्ये जिथे ओसाड जागा आहे तिथे तुम्ही कारशेड केलं तर ही जागा लोकसंख्येसाठी अधिक वापरता येईल. आज ना उद्या कांजूरचा विचार शिंदे-भाजप सरकारला करावाच लागणार आहे. त्यामुळे केवळ तुमच्या हट्टापायी मुंबईचा घात करू नका, असं ठाकरे म्हणालेत. पुढे ठाकरे म्हणतात की जर असं झालं तर मला म्हणावं लागेल की हे मुंबईबाहेरचे असल्यामुळे यांना मुंबईविषयी प्रेम नाही. मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचा असतो. तो फक्त मुंबई, ठाणे किंवा नागपूरचा नसतो, असं म्हणत ठाकरेंनी शिंदे आणि फडणवीसांना टोला लगावला आहे.

‘रावणाचा जीव जसा बेंबीत तसा…’

‘मुंबईचा घात करू नका’ हे उद्धव ठाकरेंचं वाक्य धरत राऊत पुढचा सवाल करतात की अलीकडच्या राजकारणात मुंबईचाच घात करण्याचा प्रयत्न दिसतो आहे का?, त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की मुंबईवर शिवसेनेचा असलेला पगडा भाजपला पुसायचा आहे. हे त्यांचं जुनं स्वप्न आहे. जसा रावणाचा जीव हा त्याच्या बेंबीत असतो, तसा या राजकारण्यांचा जीव हा मुंबईत आहे. दिल्ली मिळाली तरी यांना मुंबई पाहिजे असते. ज्यावेळी शिवसेना-भाजपची युती होती त्यावेळीही भाजपने सेनेला देशात पसरू दिलं नाहीच मात्र महाराष्ट्रात आणि मुंबईतही तुम्ही आम्हाला जागा देणार नसाल तर युतीला अर्थ काय?, अशी प्रतिक्रिया ठाकरेंनी दिली आहे.

‘आजही मराठीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न’

यानंतर राऊतांनी केलेला सवाल म्हणजे सध्याचं राजकीय वातावरण लक्षात घेता मुंबईचं भविष्य काय असणार?, तसेच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत आम्ही शिवसेनेचा पराभव करू, मुंबई पालिकेवरील शिवसेनेचा भगवा उतरवला जाईल, असा इशारा भाजपकडून दिला जातोय, यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की यापूर्वी देखील या निवडणुकीनंतर शिवसेना राहणार नाही, असं अनेकांनी म्हंटलं होतं. पण तसं काही झालं नाही. याआधी हिंदुत्वामध्ये फोडाफोडी करण्याचा प्रयत्न झाला. पण आता मुंबईमध्ये ‘मुंबईकर’ म्हणून सगळे एकत्र झाले आहेत. मराठीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आजही केला जातोय. मात्र मराठी माणसं एकवटलेली असून तमाम मुंबईकर आज निवडणुकांची वाट पाहत आहेत. त्याचबरोबर माझंही असंच मत आहे की मुंबईच्या निवडणुका लवकरात लवकर घ्याव्यात. केवळ मुंबईच नाही तर राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका देखील घ्याव्यात, अशी इच्छा ठाकरेंनी यावेळी बोलून दाखवली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ट्विटरच्या माध्यमातून आव्हाडांनी पुन्हा एकदा डागली मोदी सरकारवर तोफ

swarit

महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला दिला कौल;राष्ट्रवादी होणार एक नंबरचा पक्ष – महेश तपासे

News Desk

#LokSabhaElections2019 : महाराष्ट्रात ४ टप्प्यात मतदान होणार

News Desk