HW News Marathi
राजकारण

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार! – अजित पवार

मुंबई | राज्याचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होणार आहे. पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon Session) पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोध पक्षांनी बहिष्कार टाकला आहे, अशी माहिती विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. राज्यात विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे या दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी अजित पवारांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

अजित पवार म्हणाले, “राज्यातील सरकार लोकशाही व संसदीय परंपरांच्या चिंधडया उडवत स्थापन झाले आहे. विश्वासघाताच्या पायावर स्थापन झालेले हे सरकार अद्याप विधिमान्य नाही. राज्याची सत्ता हाती घेण्याआधीपासून तसेच घेतल्यानंतरही सरकारच्या डोक्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून अपात्र ठरण्याची टांगती तलवार कायम आहे. सरकारची वैधता संदिग्ध असल्याने, सरकारने आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमास उपस्थित राहणे म्हणजे भारतीय संविधानाशी, महाराष्ट्र राज्याशी व राज्यातील जनतेच्या हिताशी प्रतारणा ठरणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर आम्ही सर्वजण बहिष्कार टाकत आहे.”  अजित पवार पुढे म्हणाले, “उद्यापासून सुरु होत असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज विरोधकांच्यावतीने पत्रकार परिषद घेतली. यावेळी चहापानावर बहिष्कार टाकत असून त्याची कारणे काय आहेत, याचे सविस्तर पत्र मुख्यमंत्र्यांना दिले.”

तुम्हाला सत्तेची मस्ती आली का?, अजित पवारांचा सरकारला सवाल

कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत बोलत असताना अजित पवार यांनी सत्ताधारी आमदारांच्या वक्तव्यांवर ताशेरे ओढले. सत्ताधारी पक्षातले काही आमदार महाराष्ट्रात संघर्ष पेटावा, अशी भाषा वापरत आहेत. हात पाय तोडण्याची भाषा केली जात आहे. फुले, शाहू, आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी पहिले मुख्यमंत्री म्हणून सुसंस्कृत राजकारणाचा पाठ आपल्याला घालून दिला होता. त्यांच्या महाराष्ट्रात तोडफोडीची भाषा आपल्याला शोभते का? शिंदे-फडणवीस यांना ही भाषा योग्य वाटते का? शिंदे गटाच्या एका आमदाराने सरकारी कर्मचाऱ्याच्या कानशिलात पेटवली. तुम्हाला सत्तेची मस्ती आली का?”, असा परखड प्रश्न  अजित पवारांनी उपस्थित केला.

 

 

 

 

 

Related posts

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

swarit

राज्य सरकार सीमा भागातील जनतेच्या पाठीशी ठाम! – मुख्यमंत्री

Aprna

“विधान परिषदेत मविआची विकेट पडेल; भाजपची नाही”, चंद्रकांत पाटलांचा दावा

Aprna