HW News Marathi
देश / विदेश राजकारण

“नाशिक पदवीधर निवडणुकीसंदर्भात उद्या अंतिम निर्णय”, अजित पवारांची माहिती

मुंबई | कॉंग्रेसने नाशिक पदवीधर मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांवर कारवाई केल्याने आघाडीचा उमेदवार कोण याबाबत चर्चा निर्माण झाली आहे. दरम्यान अपक्ष महिला उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांनी उध्दव ठाकरे आणि माझ्याशी संपर्क साधला आहे त्यामुळे यावर उद्या अंतिम निर्णय होईल, अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

कॉंग्रेसचे डॉ. सुधीर तांबे यांनी अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली असताना अर्ज दाखल न केल्यामुळे नाशिकमध्ये पेच निर्माण झाला आहे. आघाडी म्हणून जागा वाटप करताना औरंगाबाद (विक्रम काळे) ही जागा राष्ट्रवादीकडे तर नाशिक कॉंग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र त्यांनी अर्ज भरला नाही. हा अर्ज न भरण्यामागे काय कारण आहे हे फक्त डॉ. सुधीर तांबेच सांगू शकतील असेही अजित पवार म्हणाले.

“तीन टर्म आमदार असल्याने या जागा वाटपावर चर्चा झाली नाही. महाविकास आघाडीतील नेते एकमेकांशी चर्चा करत होते. आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशीही चर्चा झाली होती. आताही ते सतत फोनव्दारे संपर्कात आहेत. मात्र नाशिक येथे काहीतरी गडबड आहे याची कुणकुण लागली होती आणि याची कल्पना कॉंग्रेसच्या वरीष्ठांना दिली होती”, असेही अजित पवार यांनी सांगितले. या जागा वाटपावर भाजप बोलत आहे. भाजपला संधी मिळाली आहे म्हणून बोलत आहेत मात्र त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही. आम्ही बसून योग्य तो मार्ग काढला होता मात्र अर्ज न भरल्याने प्रश्न निर्माण झाला आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

हा कॉंग्रेस अंतर्गत प्रश्न आहे त्यात महाविकास आघाडीला गोवण्यात काही अर्थ नाही. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी बसून निर्णय घेतला होता त्याला मी साक्षीदार आहे असे सांगतानाच त्यामुळे महाविकास आघाडीत समन्वय नव्हता हे मी मान्य करणार नाही असे अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.

दावोसला गेले आहेत तर जास्तीत जास्त निधी आणावा व आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करावे कारण काही लाख कोटी रुपये गुंतवणूक असणारे प्रकल्प बाहेर जाऊ देणे आणि काही लाख तरुणांना रोजगारापासून वंचित ठेवले हे घडलेले हे त्रिवार सत्य असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट करतानाच ४५ हजार कोटींचा करार होणे आणि प्रत्यक्षात गुंतवणूक होणे हे पहावे लागणार आहे. महाराष्ट्राच्या भल्यासाठी गुंतवणूक येणार असेल तर आम्हाला आनंद आहे आणि त्याचे स्वागतच करु असे स्पष्टच सांगितले.

 

हिंदी राष्ट्रभाषेविषयी देशपातळीवर चर्चा झाली होती. आपण बोलत असताना जागतिक भाषा म्हणून इंग्रजीचा तर राष्ट्रीय भाषा म्हणून हिंदी आणि मातृभाषा म्हणून मराठी भाषेचा उल्लेख करतो. पण मराठी – इंग्रजीबद्दल दूमत असण्याचे कारण नाही. या दोन्ही भाषा मोठ्याप्रमाणावर बोलल्या जातात. मात्र राष्ट्रभाषेबद्दल तशाप्रकारे केंद्रसरकारने हिंदी राष्ट्रभाषा जाहीर केलेली नाही. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यांची याबाबत वेगळी भूमिका आहे. परंतु महाराष्ट्राचा नागरीक या नात्याने विचारले तर हिंदी राष्ट्रभाषा करायला हरकत नाही तसा केंद्रसरकारने प्रयत्न करावा अशी मागणीही अजित पवार यांनी केली.

आदित्य ठाकरे यांनी मुंबई मनपातील रस्ता गैरप्रकारांबाबत ज्या बर्‍याच गोष्टी सांगितल्या त्यात शंभर टक्के तथ्य आहे. मुंबईवर प्रशासक आहे. प्रशासक व नगरविकास खात्याची वस्तुस्थिती काय आहे याचे महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. यावर आयुक्त आणि त्यांच्या टीमचे काय म्हणणे आहे हे राज्याला व मुंबईकरांना कळले पाहिजे अशी मागणी अजित पवार यांनी यावेळी केली.

आदित्य ठाकरे यांनी काढलेल्या रस्ता गैरप्रकारांबाबत पत्रकारांनीही खोलात जाऊन माहिती घ्यावी असे आवाहनही अजित पवार यांनी केले. मुंबईत रस्त्यांची जी कामे सुरू आहेत त्यामध्ये परकिलोमीटर काय खर्च येतो हे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे आणि मलाही त्याबद्दल माहिती आहे. आदित्य ठाकरे यांनी जो परकिलोमीटर १७ कोटी रुपये खर्च येतो हे सांगितले परंतु एवढा परकिलोमीटर खर्च येत नाही. मुंबई हे शहर सात बेटांवर वसलेले आहे. यामध्ये सर्व्हिस देणार्‍या ४० प्रकारच्या बाबी आहेत. त्या जमिनीखालून चालतात त्यामुळे ताबडतोब कामे होऊ शकणार नाहीत त्याला काही काळ लागणार आहे. लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी नसताना एवढ्या हजार कोटींची कामे काढण्याची घाई का? असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला.

मुंबई मनपाचा अर्थसंकल्प मागच्यावर्षी झाला मग अर्थसंकल्प झाला असताना इतके कोटी रुपये कुठून आणणार आहात. कट कुठे लावला हे कळायला मार्ग नाही. सरकारमध्ये आलोय म्हणून घिसाडघाईने सर्व रस्ते सिमेंट कॉंक्रीट करणार हे ऐकायला कानाला फार बरं वाटतं त्यात मिडियाला सांगायला पण चांगलं वाटतं परंतु ते खरंच शक्य आहे का? एकंदरीत भौगोलिक परिस्थिती बघता त्याची अंमलबजावणी होऊ शकते का? असे अनेक प्रश्न उपस्थित करत सरकारने आत्मचिंतन व आत्मपरीक्षण केले पाहिजे असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.

प्रकाश आंबेडकर हे आमच्या पक्षावर सतत का शंका घेतात हे कळायला मार्ग नाही. आदरणीय शरद पवारसाहेबांनी ओपनमधून प्रकाश आंबेडकर, रा. सू. गवई, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे यांना निवडून आणण्याचे काम केले होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत आठवले यांच्यासोबत युती राहिली होती. पंढरपूरमधून आठवले यांना निवडून आणले होते. प्रकाश आंबेडकर नेहमीच आमच्या पक्षाच्या वरीष्ठांवर अशाप्रकारची वक्तव्य करत असतात तो त्यांचा अधिकार आहे परंतु आम्ही कुणाशीही तसे वागत नाही हे प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आरोपावर अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Related posts

काबूलमध्ये भारतीय दुतावासाजवळ भीषण स्फोट, दोन ठार 90 जखमी

News Desk

Union Budget 2021 |  वीज ग्राहकांना वीज कंपनी निवडण्यासाठी पर्याय मिळणार

News Desk

जम्मू-काश्मीरमधील पुलवामात ३ दहशतवाद्यांचा खात्मा

News Desk