HW News Marathi
राजकारण

‘अंदाजपंचे’ खेळात पावसाचा अंदाज चुकू नये !

मुंबई | एकीकडे संपूर्ण देश लोकसभा निवडणुकांमध्ये दंग असताना दुसरीकडे राज्याला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. प्रसारमाध्यमांकडून रोज चर्चेच्या माध्यमातून निवडणुकांसंबंधीचे अंदाज व्यक्त केले जात आहेत. तर यंदा सरासरीच्या ९६ टक्के म्हणजे समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाने आज (१७ एप्रिल) यावर भाष्य केले आहे. “देशात असा हा ‘अंदाज अपना अपना’चा प्रयोग सुरू आहे आणि त्यात सर्वच दंग आहेत. अपेक्षा इतकीच की, या सर्व ‘अंदाजपंचे’ खेळात पावसाचा अंदाज चुकू नये आणि महाराष्ट्रावर सलग दुसऱ्या वर्षी दुष्काळाचे संकट कोसळू नये. वरुणराजाकडे आम्ही हीच प्रार्थना करीत आहोत”, असे सामनामध्ये म्हणण्यात आले आहे.

काय आहे आजचे सामनाचे संपादकीय ?

लोकसभा निवडणुकीचा ‘ज्वर’ चढला असल्याने दुष्काळाच्या झळा ‘बसूनही जाणवत नाहीत’ अशी जनतेची अवस्था आहे. राजकीय पक्ष, प्रशासनही लोकशाहीच्या या सर्वात मोठय़ा उत्सवात मग्न आहे. प्रसारमाध्यमांचेही लक्ष निवडणूक आणि ‘अंदाज’ याकडेच आहे. समाजमाध्यमे ‘स्वयंभू’ आहेत आणि जनतादेखील त्यावर ‘स्वार’ झाल्यासारखी आहे. या माध्यमांचाही स्वतःचा एक ‘अंदाज’ आहे. त्यात आता हवामान खात्याच्या समाधानकारक पावसाच्या ‘अंदाजा’ची भर पडली आहे. देशात असा हा ‘अंदाज अपना अपना’चा प्रयोग सुरू आहे आणि त्यात सर्वच दंग आहेत.

देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत. प्रसारमाध्यमांपासून सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या माध्यमांपर्यंत, गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि पारावरील गप्पांपासून विविध वाहिन्यांवरील चर्चांपर्यंत हाच एकमेव विषय चघळला जात आहे. निवडणूक वाऱ्यांचा ‘अंदाज’, मतदारांचा कल यावर खल सुरू आहे. त्यात चुकीचे किंवा अस्वाभविक काही नाही. आता याच राजकीय अंदाजांमध्ये पावसाच्या ‘अंदाजपंचे’ची भर पडली आहे. देशाच्या हवामान खात्याने यंदा सरासरीच्या 96 टक्के म्हणजे समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज जाहीर केला आहे. आधीच गेल्या वर्षीच्या कमी पावसाने या वेळी राज्याच्या बऱ्याच भागात दुष्काळाचे संकट घोंघावते आहे. तीक्र पाणीटंचाईचे सावट गडद होत आहे. उन्हाचा तडका जसजसा वाढत आहे तसतसा पाणीटंचाईचा तडाखादेखील वाढत आहे. ग्रामीण भागातील महिलांची पाण्यासाठी मैलोन् मैल होणारी पायपीट वाढू लागली आहे. जनावरांचा चारा-पाण्याचाही प्रश्न बळीराजाला भेडसावू लागला आहे. अनेक धरणांमधील आधीच कमी असलेला पाणीसाठा झपाटय़ाने कमी होत आहे. त्यामुळे नजीकच्या काळात उन्हाबरोबरच पाणीटंचाईच्या झळादेखील तीक्र होणार हे उघड आहे. त्यात

स्कायमेट’सारख्या

मान्यवर खासगी संस्थांनी काही दिवसांपूर्वी या वर्षी ‘मान्सून रुसणार, सरासरीपेक्षा कमी कोसळणार’ असा अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे दुष्काळग्रस्त जनतेची, शेतकऱ्यांची आणि सरकारचीही चिंता वाढली होती. मात्र आता हवामान खात्याने ‘समाधानकारक’ पावसाचा ‘शिडकावा’ केला आहे. त्यामुळे अंदाज म्हणून का होईना, पण जनतेला नक्कीच दिलासा मिळाला आहे. आता हवामान खात्याच्या पावसाच्या अंदाजांचा पूर्वानुभव फारसा ‘समाधानकारक’ नसला आणि हा ‘शिडकावा’ अंदाजाचा आहे, प्रत्यक्ष पावसाचा नाही हे खरे असले तरी मान्सूनवरच अवलंबून असलेल्या येथील जनतेसमोर आणि बळीराजासमोर दुसरा पर्याय तरी काय आहे? हवामान खात्याचा अंदाज गृहीत धरून खरीपाची कामे करायची, शेतीची मशागत करायची, पावसाच्या अंदाजानुसार पेरणी करायची, अंदाज चुकला आणि पावसाने ओढ दिली की पुन्हा दुबार पेरणी ठरलेलीच आहे. त्यासोबत वाढणारा कर्जाचा बोजा आणि अनिश्चित पीक उत्पादनाचे ओझे सहन करीत आभाळाकडे डोळे लावून बसायचे. एवढे करूनही वरुणराजाने डोळे वटारलेच तर मायबाप सरकारकडे अपेक्षेने पाहायचे. प्रत्येक पावसाळ्यात बळीराजाचा दिनक्रम वर्षानुवर्षे असाच राहिला आहे.

मान्सून लहरी आहे

हे मान्य केले तरी कालपर्यंतच्या सरकारांचा कारभारही त्यापेक्षा वेगळा नव्हता. त्यात गेल्या वर्षी पावसानेच हात आखडता घेतला. त्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रब्बीची पेरणीही होऊ शकली नव्हती. धरणे निम्मीदेखील भरली नाहीत. त्यामुळे दुष्काळाचे संकट आताच गडद झाले आहे. मात्र सर्वत्र लोकसभा निवडणुकीचा ‘ज्वर’ चढला असल्याने दुष्काळाच्या झळा ‘बसूनही जाणवत नाहीत’ अशी जनतेची अवस्था आहे. राजकीय पक्ष, प्रशासनही लोकशाहीच्या या सर्वात मोठय़ा उत्सवात मग्न आहे. ती आपल्यासाठी कर्तव्यपूर्ती आहे असा त्यांचा दावा असू शकतो आणि तो चुकीचाही नाही. प्रश्न टीआरपी आणि महसुलाचा असल्याने प्रसारमाध्यमांचेही लक्ष निवडणूक, मतदान आणि ‘अंदाज’ याकडेच जास्त आहे. समाजमाध्यमे तर ‘स्वयंभू’च आहेत आणि जनतादेखील त्यावर ‘स्वार’ झाल्यासारखी आहे. या माध्यमांचाही स्वतःचा एक ‘अंदाज’ आहे. त्यात आता हवामान खात्याच्या समाधानकारक पावसाच्या ‘अंदाजा’ची भर पडली आहे. देशात असा हा ‘अंदाज अपना अपना’चा प्रयोग सुरू आहे आणि त्यात सर्वच दंग आहेत. अपेक्षा इतकीच की, या सर्व ‘अंदाजपंचे’ खेळात पावसाचा अंदाज चुकू नये आणि महाराष्ट्रावर सलग दुसऱ्या वर्षी दुष्काळाचे संकट कोसळू नये. वरुणराजाकडे आम्ही हीच प्रार्थना करीत आहोत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला अर्थसंकल्प पूर्व आढावा

Aprna

“आमच्याकडे बाळासाहेब थोरातांचा कुठलाही राजीनामा आलेला नाही”, नाना पटोलेंची प्रतिक्रिया

Aprna

मला कुठेही पाठवा, मी जादू दाखवीन !

News Desk