HW News Marathi
राजकारण

दिल्लीची आजचीच घडी कायम राहील, ‘ती’ विस्कटावी असे वातावरण देशात नाही !

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान पदासाठी योग्य अशा ३ नेत्यांची नावे सुचविली आणि राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा रंगल्या. याच पार्श्वभूमीवर आज (३० एप्रिल) शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “पंतप्रधानपदाच्या शोधातील तीन पात्रांची नावे जाहीर केली. आता चौथे नाव नजरचुकीने राहून गेले ते राहुल गांधी. स्वतः पवार पाचवे आहेत. अर्थात या पाचही पात्रांना दिल्लीतील रंगमंचावर भूमिका मिळण्याची शक्यता अजिबात नाही. दिल्लीची आजचीच घडी कायम राहील. घडी विस्कटावी असे वातावरण देशात नाही”, असा विश्वास शिवसेनेने व्यक्त केला आहे.

काय आहे आजचे सामनाचे संपादकीय ?

काँग्रेसविरोधात पवारांनी दोन वेळा भूमिका घेतल्या. एकदा इंदिरा गांधी हयात असताना व नंतर सोनिया गांधींच्या विरोधात विदेशी वंशाचा मुद्दा उपस्थित करून त्यांनी ‘बंड’ पुकारले, पण शेवटी बंडोबा थंडोबा झाला. आताही आवळ्या-भोपळ्याची मोट बांधून काही नवे घडवता येईल काय? या भूमिकेत ते आहेत. त्यांनी पंतप्रधानपदाच्या शोधातील तीन पात्रांची नावे जाहीर केली. आता चौथे नाव नजरचुकीने राहून गेले ते राहुल गांधी. स्वतः पवार पाचवे आहेत. अर्थात या पाचही पात्रांना दिल्लीतील रंगमंचावर भूमिका मिळण्याची शक्यता अजिबात नाही. दिल्लीची आजचीच घडी कायम राहील. घडी विस्कटावी असे वातावरण देशात नाही!

उत्तर प्रदेशात मायावतींच्या जाहीर सभेत एक उधळलेला सांड घुसला. सांडाने सभेसाठी जमलेल्या गर्दीची पांगापांग केली. त्या सभेसाठी अखिलेश यादव हेदेखील हेलिकॉप्टरने पोहोचणार होते. अखिलेश यांनी हेलिकॉप्टरमधून मैदानावरील सांडाने उधळलेली सभा पाहिली व तो सांड शांत होईपर्यंत यादवांनी हेलिकॉप्टर उतरवण्याची हिंमत दाखवली नाही. सभेत सांड सोडण्याचे कारस्थान भारतीय जनता पक्षाचे असल्याचा आरोप मायावती यांनी केला आहे. विरोधकांच्या सभा उधळण्यासाठी भाजपास अशा सांडांची खरोखरच गरज आहे काय? शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेसचे चार आण्याचे सदस्यत्व स्वीकारले व त्यांनी मोहम्मद अली जीनांचे गुणगान सुरू केले. लोकांचा संताप दिसताच सिन्हा म्हणाले, ‘‘नाही हो, मला मौलाना आझादांचे नाव घ्यायचे होते. चुकून जिभेवरून जीनांचे नाव सटकले!’’ काँग्रेसच्या ‘पोटांतले’ जीना शेवटी असे ओठावर येत असतात. सिन्हा यांची त्यात काही चूक आहे असे आम्हाला वाटत नाही. सांडांनी सभा उधळावी तशी जुनेजाणते नेते भूमिका आणि विचारांची उधळण करीत असतात व नंतर सपशेल माघार घेत असतात. शरद पवार यांनीही आता पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत एक विधान करून गोंधळ उडवण्याचा प्रयोग केला. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी बहुमत मिळवण्यास अपयशी ठरली तर प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती हे

तीन जण

पंतप्रधानपदाचे उमेदवार वाटतात. या पवारांच्या विधानाने खळबळ कमी आणि खळखळ जास्त झाली. खळबळीचा प्रश्नच नाही, पण काँग्रेसच्या गोटात मात्र अपेक्षेप्रमाणे खळखळ झाली. पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींना शरद पवारांचा पाठिंबा नाही असे नाराजीचे सूर उमटले. बाजारात तुरी असतानाच काँग्रेस महाआघाडीत पंतप्रधानपदावरून ‘मारामारी’ सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले. राहुल गांधी हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत, असे काँग्रेसचे प्रवक्ते बोलू लागले. आता पवारांनी नेहमीप्रमाणे शब्द फिरवला असून आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचा खुलासा केला आहे. राहुल गांधींशिवाय पंतप्रधानपदासाठी महाआघाडीकडे आणखी कोणते नेते आहेत, या प्रश्नावर आपण तीन पात्रांची नावे घेतल्याचे पवार कितीही सांगत असले तरी या नाट्यातील ‘चौथे’ किंवा ‘पाचवे’ पात्र स्वतः शरद पवार आहेत. देशात स्थिर सरकार हवे असे पवार काल म्हणाले; पण ममता, मायावती, चंद्राबाबू यांच्यात स्थिर सरकार देण्याची क्षमता आहे काय? याचे उत्तर पवारांनी द्यायला हवे. महाराष्ट्रातील निवडणुका आता संपल्या आहेत. त्यामुळे पवारांनी खरे बोलायला हरकत नाही. 2014 साली महाराष्ट्रात त्रिशंकू विधानसभा निवडून आली. तेव्हाही कुणीही मागितला नसताना पवार यांनी राज्यांत सत्तास्थापनेसाठी भाजपास

परस्पर पाठिंबा

जाहीर केला. का? तर म्हणे स्थिर सरकारसाठी. स्थिर सरकार हा पवारांच्या राजकारणातील एक परवलीचा शब्द आहे. त्यामुळे उद्या दोन-पाच जागांचा तुटवडा पडलाच तर स्वतः शरद पवारांनी स्थिर सरकारच्या नावाखाली मोदी यांना पाठिंबा दिला तरी कुणाला आश्चर्य वाटणार नाही. कारण पवारांच्या स्वप्नातील ‘पात्रां’च्या मंत्रिमंडळात अनुभवी आणि ज्येष्ठ पवार कसे काम करणार? स्वतः शरद पवार हे स्थिर सरकारच्या गप्पा मारीत असले तरी त्यांच्या राजकारणाला कधीच स्थैर्य लाभलेले नाही. पु.लो.द.चे त्यांचे मंत्रिमंडळही अस्थिर होते व त्यानंतर अनेकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनही त्यांना स्थैर्य लाभले नाही. काँग्रेसविरोधात पवारांनी दोन वेळा भूमिका घेतल्या. एकदा इंदिरा गांधी हयात असताना व नंतर सोनिया गांधींच्या विरोधात विदेशी वंशाचा मुद्दा उपस्थित करून त्यांनी ‘बंड’ पुकारले, पण शेवटी बंडोबा थंडोबा झाला व काँग्रेस पक्षाशीच हातमिळवणी करून पवार पुन्हा केंद्रात मंत्री झाले. आताही आवळ्या-भोपळ्याची मोट बांधून काही नवे घडवता येईल काय? या भूमिकेत ते आहेत. त्यांनी पंतप्रधानपदाच्या शोधातील तीन पात्रांची नावे जाहीर केली. आता चौथे नाव नजरचुकीने राहून गेले ते राहुल गांधी. स्वतः पवार पाचवे आहेत. अर्थात या पाचही पात्रांना दिल्लीतील रंगमंचावर भूमिका मिळण्याची शक्यता अजिबात नाही. दिल्लीची आजचीच घडी कायम राहील. घडी विस्कटावी असे वातावरण देशात नाही!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…इतके दुटप्पी माणसाने वागू नये”, अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

Aprna

निवडणूक वर्षात ‘दारूकामा’चा जीवघेणा धंदा रोखण्याचा ‘जोश’ सरकार दाखविणार ?

News Desk

दै. सामनाच्या पहिल्या पानावर मेट्रो लोकार्पणाच्या कार्यक्रमाची पानभर जाहिरात; भाजपच्या नेत्याचा टोला

Aprna