HW News Marathi
राजकारण

चांगल्या-वाईट कारणाने राज्यातील दिग्गजांच्या ‘या’ गाजलेल्या प्रचारसभा

मुंबई | राज्यात आज (२१ ऑक्टोबर) अखेर बहुप्रतीक्षित अशा १४ व्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्याच्या विधानसभेसाठी एकाच टप्प्यात ही मतदान प्रक्रिया पार पडेल. तर येत्या २४ ऑक्टोबरला निकाल जाहीर होतील. या निवडणुकीकरिता काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी भाजप-शिवसेनेत केलेले पक्षांतर, या पार्श्वभूमीवर ढवळून निघालेले राज्यातील राजकारण, दिग्गज राजकीय नेत्यांचे एकमेकांवरचे टोकाचे आरोप-प्रत्यारोप, टोकाची टीका, भाजप-शिवसेनेची वाढलेली ताकद, भाजपच्या दिग्गज नेत्यांचे राज्यावर असलेले लक्ष, आणि अन्य पक्षांची सुरु असलेली आपल्या अस्तित्त्वाची लढाई असे बरंच काही या निवडणुकांच्या अनुषंगाने पाहायला मिळाले. दरम्यान, यावेळी झालेल्या दिग्गज नेत्यांच्या अनेक प्रचारसभा चांगल्या – वाईट अशा दोन्ही कारणांमुळे प्रचंड गाजल्या.

उद्धव ठाकरेंवर हर्षवर्धन जाधवांची वादग्रस्त टीका 

हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे लोकसभेत शिवसेना उमेदवार चंद्रकांत खैरेंचा पराभव झाल्याचे मानले जाते. “कन्नडमधील एक विश्वासघातकी… ज्याने भगवा उतरविण्यामध्ये हिरव्याची साथ दिली होती, त्याला आता अजिबात माफी नाही. चुकतोय, लहान म्हणून मी चुका पोटात घालत होतो. पण, भगव्याशी हरामखोरी मी सहन करू शकत नाही”, अशी जहरी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना मात्र हर्षवर्धन जाधव यांची जीभ चांगलीच घसरली. “तुम्हाला जर मुसलमानांबद्दल एवढं वावडं आहे तर मग अब्दुल सत्तार तुमच्या आईचा नवरा लागतो का ?”,असे म्हणत हर्षवर्धन यांनी यांनी उद्धव ठाकरेंवर अत्यंत खालच्या पातळीची टीका केली. त्यानंतर, बुधवारी (१६ ऑक्टोबर) जाधव यांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना समोर आली. शिवसैनिकांनीच हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी यावेळी केला.

मुख्यमंत्री अन् शरद पवारांमध्ये रंगलेला ‘पैलवान वाद’ 

“राज्यात आमच्या विरोधात कोणी दिसतही नाही. आमचे पैलवान तेल लावून कुस्तीसाठी तयार आहेत. पण समोर कोणी दिसतच नाही”, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीका केली होती. “कुस्ती पैलवानांशी होते. या ‘अशांशी’ नाही”,असे म्हणत हातवारे करत पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. मात्र, शरद पवारांनी केलेल्या हातवाऱ्यांमुळे मोठा वाद देखील निर्माण झाला. “आम्ही नटरंगसारखे काम कधी केले नाही. त्यामुळे, आम्ही हातवारे करू शकत नाही. आम्हाला असे हातवारे करणेही शोभत नाही. आमची ती संस्कृती नाही”, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा पवारांवर निशाणा साधला. पण हा पैलवान वाद काही थांबला नाही. त्यानंतर पुन्हा पवारांनी “मुख्यमंत्र्यांना माहित नाही कि मी ‘महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे’चा अध्यक्ष आहे” असे म्हणत मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.

साताऱ्यातली शरद पवारांची भर पावसातली बहुचर्चित सभा

आगामी विधानसभा निवडणुकीत विशेषतः राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाची साथ सोडल्यानंतर स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रचाराची धुरा हातात घेतली. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी राज्यभर फिरून आपल्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या.  त्यातही शरद पवार यांनी शुक्रवारी (१८ ऑक्टोबर) साताऱ्यात राष्ट्रवादीचे लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या समर्थनार्थ भर पावसात घेतलेली प्रचारसभा प्रचार चर्चेत आली. भरपावसात शरद पवारांनी दिलेल्या भाषणाचे सर्व स्तरांतून मोठे कौतुक झाले. त्याचप्रमाणे,”लोकसभेमध्ये माझ्याकडून उमेदवार निवडण्यात चूक झाली”, असे म्हणत शरद पवार यांनी साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला.

वाकवली ती मान अन् म्हणे पक्षाचे नाव ‘स्वाभिमान’ ! 

भाजप खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपला ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ भाजपमध्ये विलीन केला खरा पण शिवसेनेला हे विलीनीकरण काही रुचले नाही. त्यामुळे, नारायण राणेंच्या या पक्ष विलीनीकरणानंतर कणकवलीत झालेल्या जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राणे पिता-पुत्रांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. “वाकवली ती मान अन् म्हणे पक्षाचे नाव ‘स्वाभिमान’. आज जर कोणी खुश असेल तर ‘स्वाभिमानी’ हा शब्द. ते ज्या पक्षात जातील त्या पक्षाची वाट लावतील. आता तर ते भाजपमध्ये आलेत त्यांना शुभेच्छा. ते मातोश्रीच्या मीठाला जागले नाहीत. ही पाठीत वार करणारी औलाद आहे. तुमच्या भल्यासाठी राणेंना दूर करा”, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी यावेळी भाजपला मित्रत्त्वाचा सल्ला देखील दिला.

आम्ही १३ वर्ष मंत्रीपद देऊनही तुम्हाला काही करता येत नसेल तर बांगड्या भरा !

“विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीसांनी पुराव्यानिशी बबनराव पाचपुते यांचा भ्रष्टाचार उघड करत मंत्री पदावरून खाली खेचण्याची मागणी केली होती. मात्र, आता तेच काष्टीमध्ये येऊन स्वतः पाचपुतेंची स्तुती करत आहेत. मुख्यमंत्री साहेब हे वागणं बरं नव्हं”, असे म्हणत राष्टवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार घनश्याम शेलार यांच्या श्रीगोंदा येथील प्रचारसभेत मुख्यमंत्री फडणवीस यांना टोला लगावला आहे. तर “आम्ही १३ वर्ष मंत्रीपद देऊनही जर तुम्हाला काही करता आले नसेल तर बांगड्या भरा”, अशा बोचऱ्या शब्दात शरद पवार यांनी बबनराव पाचपुतेंवर बोचरी टीका केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवडणुकीत कॉंग्रेस करणार कडेकोट बंदोबस्त

News Desk

शिवसेनेचा 56 वर्धापन दिन हॉटेल वेस्ट इनमध्ये होणार साजरा; उद्धव ठाकरे काय बोलणार?

Aprna

शीख दंगली प्रकरणी सज्जन कुमार यांना जन्मठेप

News Desk