HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

संजय राऊतांनी हक्कभंग नोटीसला दिले उत्तर; पत्रात म्हणाले…

मुंबई | “मी संपूर्ण विधान मंडळाबाबत कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केले नसून माझे वक्तव्य एका विशिष्ट गटापुरतेच मर्यादित आहे”, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधिमंडळाने केलेल्या हक्कभंग नोटीसला आज उत्तर दिले. संजय राऊत यांच्या विरोधात विधीमंडळाने हक्कभंगांची मागणी केली होती. संजय राऊतांनी आज (8 मार्च) उत्तर दिले आहे.

 

संजय राऊतांनी नोटीसमध्ये म्हणाले, “महाराष्ट्र विधान मंडळाचा व सदस्यांचा मी नेहमीच आदर करतो. प्रत्येक नागरिकाचे ते कर्तव्य आहे. मी स्वतः अनेक वर्षे राज्यसभेचा सदस्य असल्याने मला अशा संसदीय मंडळांचे महत्त्व माहीत आहे. मी संपूर्ण विधान मंडळाबाबत कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केले नसून माझे वक्तव्य एका विशिष्ट गटापुरतेच मर्यादित आहे.”

 

संजय राऊतांनी नोटीसमध्ये नेमके काय लिहिले

मा. प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय,

जय महाराष्ट्र!

कोल्हापुरातील एका कार्यक्रमात विधान मंडळाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत काही सदस्यांनी आक्षेप घेतला व विशेषाधिकार भंग व अवमानाची सूचना मांडली. याबाबत खुलासा करण्यासाठी आपण मला ३ मार्च २०२३ पर्यंत सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत मुदत दिली.

१) मी आपणास नम्रपणे नमूद करू इच्छितो की, मी दि. ४ मार्चपर्यंत पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होतो व कर्नाटकच्या सीमेवरील भागात असल्याने मुंबईशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे दिलेल्या मुदतीत खुलासा करणे शक्य झाले नाही. तरी कृपया सविस्तर खुलासा करण्यासाठी आणखी मुदतवाढ मिळावी.

२) महाराष्ट्र विधान मंडळाचा व सदस्यांचा मी नेहमीच आदर करतो. प्रत्येक नागरिकाचे ते कर्तव्य आहे. मी स्वतः अनेक वर्षे राज्यसभेचा सदस्य असल्याने मला अशा संसदीय मंडळांचे महत्त्व माहीत आहे. मी संपूर्ण विधान मंडळाबाबत कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केले नसून माझे वक्तव्य एका विशिष्ट गटापुरतेच मर्यादित आहे. हे कृपया लक्षात घ्यावे.

तरीही या प्रकरणाबाबत सविस्तर खुलासा करण्याबाबत मुदतवाढ द्यावी.

आपला नम्र,

(संजय राऊत)

 

संजय राऊत नेमके काय म्हणाले

कोल्हापूर दौऱ्यादरम्यान संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना विधिमंडळाचा उल्लेख ‘चोर’मंडळ असा केला होता. महाराष्ट्र विधिमंडळ हे तर ‘चोर’मंडळ आहे. असे म्हणत संजय राऊतांनी शिंदे गटावर निशाणा साधला होता. संजय राऊतांच्या या वक्तव्यावरून विधिमंडळात सत्ताधांऱ्यांनी त्यांच्याविरोधात हक्कभंग आणण्याची मागणी केली होती.

 

 

 

 

Related posts

हाताला सलाईन, अंगात अशक्तपणा, तरीही धैर्यशील माने भर पावसात मराठा मोर्चाच्या अग्रस्थानी!

News Desk

मला सुद्धा अनेक आजार आहेत, पण त्यामुळे मी मागे हटलो नाही – दीपक म्हैसेकर

News Desk

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या कुंचल्याद्वारे पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींना फटकारलंय.

News Desk