HW News Marathi
राजकारण

जगभ्रमंती करून हाती काही नाही !

मुंबई | पंतप्रधान मोदी यांच्या परदेशी दौऱ्यावर १४ हजार कोटी खर्च झाले हे पैसे जनतेच्या तिजोरीतून उडवले असले तरी त्या बदल्यात हिंदुस्थानला काय मिळाले यावर खुली चर्चा होणे गरजेचे आहे. मोदींनी जगभ्रमणात सगळ्यांचे रेकॉर्ड मोडले आहेत. म्हणजे भगवान विष्णूचे ते अकरावे की बारावे असे अवतार आहेत. त्यामुळे त्यांना जगभरातील भक्तांना दर्शन देण्यासाठी भ्रमण करावे लागते. हिंदुस्थानशी अनेक देशांचे संबंध बरे नव्हते. ते दुरुस्त करण्यासाठी पंतप्रधानांना अशी जागतिक वणवण करावी लागते.

अमेरिकेस मोदी यांनी सर्वाधिक मिठय़ा मारल्या त्या अमेरिकेने हिंदुस्थानला धमक्या देणे सुरू केले आहे. हिंदुस्थानने आधी फ्रान्सकडून राफेल विमानांची खरेदी केली, त्या सौद्यातील घोटाळा उघडा पडला आहे. पाठोपाठ रशियासोबत ‘एस 400’ क्षेपणास्त्र यंत्रणेचा सौदा करताच अमेरिकेने आदळआपट सुरू केल्याची टीका सामनाच्या संपादकीयमधून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

सामनाचे आजचे संपादकीय

पंतप्रधान मोदी यांच्या 14 हजार कोटींच्या जगभ्रमणात मिळवले काय, हा प्रश्नच आहे. ‘आजाद हिंद सरकार’ स्थापनेस 75 वर्षे झाली, त्यानिमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावर पुन्हा तिरंगा फडकवला. मोदी त्यावेळी शूराचे शब्द बोलले, ‘‘हिंदुस्थानकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांवर दुप्पट ताकदीने पलटवार करू.’’ आम्ही पंतप्रधानांच्या भूमिकेचे स्वागत करीत आहोत. फक्त अमेरिकेच्या दबावाखाली येऊन ‘एफ-16’चा राफेल छाप सौदा करू नका. ट्रम्प प्रशासनाने दिलेल्या धमकीवर कसा पलटवार करणार?

पंतप्रधान मोदी यांनी जगभ्रमणात सगळय़ांचेच रेकॉर्ड मोडले आहेत. अर्थात भगवान विष्णूचे ते अकरावे की बारावे असे अवतार आहेत. त्यामुळे त्यांना जगभरातील भक्तांना दर्शन देण्यासाठी भ्रमण करावे लागते. हिंदुस्थानशी अनेक देशांचे संबंध बरे नव्हते. ते दुरुस्त करण्यासाठी पंतप्रधानांना अशी जागतिक वणवण करावी लागते. या जागतिक वणवणीवर आतापर्यंत 14 हजार कोटी रुपयांचा चुराडा झाला असून हे पैसे जनतेच्या तिजोरीतून उडवले असले तरी त्या बदल्यात हिंदुस्थानला काय मिळाले यावर खुली चर्चा होणे गरजेचे आहे. कारण ज्या अमेरिकेस मोदी यांनी सर्वाधिक मिठय़ा मारल्या त्या अमेरिकेने हिंदुस्थानला धमक्या देणे सुरू केले आहे. हिंदुस्थानने आधी फ्रान्सकडून राफेल विमानांची खरेदी केली, त्या सौद्यातील घोटाळा उघडा पडला आहे. पाठोपाठ रशियासोबत ‘एस 400’ क्षेपणास्त्र यंत्रणेचा सौदा करताच अमेरिकेने आदळआपट सुरू केली. ‘‘रशियासोबत हा सौदा झाला तर बघून घेऊ’’ अशी भाषा आधी वापरण्यात आली. मात्र आता हा सौदा झाल्यावर त्यांची मांडवलीची भाषा अशी की, ‘‘ठीक आहे, तुम्ही रशियाकडून ‘एस 400’ घेतलीत ना, तशी अमेरिकेकडून ‘एफ-16’ लढाऊ विमाने खरेदी करा, नाहीतर हिंदुस्थानवर ‘अमेरिकाज ऍडव्हर्सरीज थ्रू सँक्शन्स ऍक्ट’चा वापर करून बंधने टाकू.’’ हिंदुस्थानवर आर्थिक बंधने लादण्याची ही धमकी चिंताजनक आहे. ही काही दोस्तीची भाषा नाही. ओबामा व मोदी हे म्हणे दोस्त होते. आता ट्रम्पसुद्धा मित्र आहेत.

जागतिक राजकारणात

प्रेसिडेंट ट्रम्प हे मोदी यांचा सल्ला किंवा मार्गदर्शन घेत असल्याचे बोलले जाते. इतके प्रेमाचे नाते असताना अमेरिकेने आम्हाला अशा धमक्या देणे योग्य आहे काय? रशियाकडून माल घेतलात तसा आमचाही माल उचला असे सांगणे हा व्यापार आहे. ही शुद्ध मैत्री नसून मतलबाचे नाते आहे. जगातील अनेक देश हिंदुस्थानला ‘बाजार’ मानत आहेत. सवाशे कोटींची लोकसंख्या म्हणजे त्यांच्यासाठी फक्त बाजार आहे. या बाजारावर नियंत्रण हवे म्हणून दोस्तीचे नाटक केले जाते. त्यात हिंदुस्थानच्या पैशांनी स्वतःची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे धंदेही सुरूच आहेत. फ्रान्सने राफेल विमानांचा महागडा सौदा गळय़ात मारून स्वतःची चांदी करून घेतली. रशियाने ‘एस 400’ क्षेपणास्त्र वगैरेंचे दुकान लावून घेतले व आता अमेरिका ‘एफ-16’साठी गाळा मारीत आहे. पुन्हा आमचा माल विकत घेतला नाहीत तर धमक्या देणे सुरूच आहे. बरं, जी ‘एफ-16’ विमाने अमेरिका आमच्या गळय़ात मारणार आहे, तीच विमाने हे ‘ट्रम्प मंडळ’ पाकिस्तानला आधीच विकून मोकळे झाले आहे. म्हणजे ‘एफ-16’ची सर्व गुपिते व तंत्रज्ञान पाकडय़ांकडे आधीच पोहोचले आहे. तरीही हिंदुस्थानने ‘एफ-16’चा सौदा करावा असे ट्रम्प प्रशासनास वाटते. रशिया, अमेरिका, फ्रान्सने सरळ सरळ आमच्या तिजोरीचीच लुटमार चालवली आहे. जगभरात अस्थिरता, अशांतता निर्माण करायची, दोन देशांना एकमेकांविरुद्ध लढवायचे व त्या दोघांनाही आपली शस्त्र विकायची हा बड्या राष्ट्रांचा खेळ जुनाच आहे. हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यात

ज्या दिवशी समेट होईल

त्या दिवशी यापैकी कित्येक राष्ट्रे भिकेला लागतील. म्हणून त्यांना शांतता नको आहे. इराक, इराण, सीरिया, लिबिया, इजिप्त, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि हिंदुस्थानातही त्यांना युद्धसदृश स्थिती कायम हवीच असते. हिंदुस्थानसारखा देश प्रगतीच्या गोष्टी करतो. मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडियाचे ढोल वाजवतो, पण देशाच्या संरक्षणविषयक सामग्रीसाठी आजही त्याला युरोप-अमेरिकेवर अवलंबून राहावे लागते. कारण हे सौदे मोठे असतात. बोफोर्स-राफेलप्रमाणे त्यात ‘दलाली’ खाणारे आहेत व त्यासाठीच अशा सौद्यांचे महत्त्व आहे. सौदेबाजी व दलाली करणारी माणसे जोपर्यंत राजकारणात आहेत तोपर्यंत राजकीय गंगा स्वच्छ होणार नाही व जागतिक नात्यांनाही काही अर्थ उरत नाही. अमेरिका, रशिया, फ्रान्ससारखी ‘व्यापारी’ राष्ट्रे सोडा, पण आमच्या सीमेवरील एकही राष्ट्र आमचा मनापासून मित्र नाही. हिंदूंचा देश म्हणून नकाशावर असलेला नेपाळही चीनच्या भजनी लागला व पाकिस्तानच्या इशाऱ्यावर नाचतो. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या 14 हजार कोटींच्या जगभ्रमणात मिळवले काय, हा प्रश्नच आहे. ‘आजाद हिंद सरकार’ स्थापनेस 75 वर्षे झाली, त्यानिमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावर पुन्हा तिरंगा फडकवला. मोदी त्यावेळी शूराचे शब्द बोलले, ‘‘हिंदुस्थानकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांवर दुप्पट ताकदीने पलटवार करू.’’ आम्ही पंतप्रधानांच्या भूमिकेचे स्वागत करीत आहोत. फक्त अमेरिकेच्या दबावाखाली येऊन ‘एफ-16’चा राफेल छाप सौदा करू नका. ट्रम्प प्रशासनाने दिलेल्या धमकीवर कसा पलटवार करणार?

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गरीबांच्या खिशातला पैसा श्रीमंतांकडे जातो | राहुल गांधी

News Desk

शिवसेना-मनसेत पुन्हा पोस्टर वॉर

swarit

जयाप्रदा रामपूरमधून आझम खानविरोधात निवडणूक लढणार

News Desk