HW News Marathi
क्रीडा

भारतीय महिला संघाचे टी-२० वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत स्थान निश्चित

मुंबई | भारतीय महिला संघाने टी-२० वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत आयर्लंड संघावर ५२ धावांनी मात करुन उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. भारतीय महिला संघाचा हा सलग तिसरा विजय आहे. मिताली राजच्या अर्धशतकानंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारतीय महिला संघाने हा विजय मिळवला. या आधीच्या दोन लढतींत भारताने न्यूझीलंड आणि पाकिस्तानवर मात केली होती. दरम्यान, भारताचा साखळीतील शेवटचा सामना शनिवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होत आहे.

आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मिताली राज आणि स्मृती मानधना यांनी १० षटकांत ६७ धावांची सलामी दिली. स्मृतीने २९ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारसह ३३ धावा केल्या. स्मृतीने मागील दोन लढतींत २६ आणि २ धावा केल्या होत्या. यानंतर इतर फलंदाजांकडून फटकेबाजीची अपेक्षा होती. मात्र, जेमिमा रॉड्रिगेज तीन चौकार मारून माघारी परतली. हरमनप्रीत कौरलाही मोठी खेळी करता आली नाही. वेदा कृष्णमूर्तीने पुन्हा एकदा निराशा केली. डी. हेमलताही चार धावांवर धावबाद झाली. मिताली राजने एकाबाजूने किल्ला लढविला. तिने ५६ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारसह ५१ धावा केल्या. मितालीचे हे सलग दुसरे अर्धशतक ठरले आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय टी-२०मधील हे तिचे १७वे अर्धशतक ठरले.

लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडच्या महिलांना भारतीय गोलंदाजांचा समाचार घेण्यात अपयश आले. लेविस ९ धावांवर बाद झाल्यानंतर शिलिंग्टन आणि जॉयसने डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा; पण ही जोडी फुटली आणि आयर्लंडच्या फलंदाजांनी भारतीय महिलांसमोर शरणागती पत्करली. भारताने दिलेल्या १४६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडला ८ बाद ९३ धावाच करता आल्या. भारताकडून राधा यादवने तीन विकेट घेतल्या.

Related posts

लंच आधी शतक करणारा शिखर धवन पहिला भारतीय फलंदाज

News Desk

रोहित शर्मासह ५ क्रीडापटूंना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर 

News Desk

दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून पृथ्वी शॉची माघार

News Desk