मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे त्यांच्या बेधडक आणि बिनधास्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधातल्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी त्यांचं मत आता मांडलं आहे. नारायण राणे यांना महात्मा राणे असा टोला लगावत राऊतांनी भाजपवरही आगपाखड केली आहे. तसंच भाजप महाराष्ट्रातून नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही’, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.
ही कसली चिथावणी तुम्ही देत आहात?
संजय राऊत यांनी ‘इंडिया टुडेशी’ संवाद साधताना त्यांनी भाजपला देखील टोला लगावला आहे. ‘भाजपचे केंद्रीय मंत्री महात्मा नारायण राणे म्हणताहेत की, मुख्यमंत्र्यांना थप्पड मारा; हे कसलं उत्तेजन तुम्ही देत आहात? ही कसली चिथावणी तुम्ही देत आहात? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला करण्याची तुम्ही चिथावणी देत आहात. आपण (नारायण राणे) केंद्रीय मंत्री आहात. तुम्ही घटनेनुसार शपथ घेतलेली आहे. कायदा सुव्यवस्थेला मदत करणं हे मंत्री म्हणून तुमचं कर्तव्य आहे.पण तुम्ही महाराष्ट्रात येता आणि जनआशीर्वाद यात्रेच्या नावाखाली २४ तास फक्त शिवसेनेला शिव्या देत आहात, त्यातून तुम्हाला काय मिळणार आहे’, असा सवाल राऊत यांनी केला आहे.
ते २५ वर्षे शिवसेनेतच होते
नारायण राणे भाजपमध्ये जाण्याआधी शिवसेनेत होते. त्यावरून देखील संजय राऊतांनी त्यांना सुनावलं आहे. “‘नारायण राणे यांचा इतिहास मग तो राजकीय असो वा इतरही. ते २५ वर्षे शिवसेनेतच होते. त्यामुळे ज्या धमक्या दिल्या जात आहेत, ही शाळा शिवसेनेचीच आहे. तुम्ही बाहेर पडलात म्हणून शाळा बंद होत नाही’. ‘बाटगे आणि उपरे यांना जवळ घेऊन भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने हे राजकारण सुरू केलं आहे, हे त्यांच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही’, अशा शब्दात राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.
राणेंना नेस्तानाबूत केल्याशिवाय राहणार नाही
भास्कर जाधव यांनी नारायण राणेंना नेस्तानाबूत करण्याचा इशारा दिला आहे. मी यापूर्वी अनेक वेळा सांगितलं राणे आणि त्यांचे दोन पुत्र. त्यांना पुत्रं म्हणायचं की आणखी काही म्हणयाचं हे तुम्ही ठरवा. हे तिघेही म्हणजे संपूर्ण कोकणाच्या संस्काराला लागलेला महाकलंक आहे. राणे आणि त्यांच्या मुलांची वक्तव्ये चुकीची आहेत. केंद्रीय मंत्री म्हणूनही राणेचं वक्तव्य संतापजनक आहे. यापूर्वीही त्यांनी घाणेरड्या भाषेत वक्तव्य केली आहेत, असं सांगतानाच राणेंनी कानाखाली मारेल म्हणून सांगितलं… ज्या पद्धतीने शिशुपालाचे शंभर गुन्हे झाले होते. त्याप्रमाणे राणेंचे हे शंभर गुन्हे पूर्ण झाले आहेत. महाराष्ट्राची माती, वैचारीक भूमिका राणेंना नेस्तानाबूत केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
विनायक राऊतांनी मोदींना लिहिलं पत्र
विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पदावरून काढण्यात यावे अशी मागणी आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून, केंद्रीय मंत्रिमंडळाला मंत्री नारायण राणे यांना हटवण्याची विनंती केली. नारायण राणे यांनी शिवसेना प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.