मुंबई | अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकं प्रकरणावरून राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. या प्रकरणात ‘एनआयए’ने सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर विरोधकांकडून सातत्याने सरकारला लक्ष्य केलं जात आहे. आरोप प्रत्यारोपाच्या गदारोळात मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. या बदल्यांवर शिवसेनेनं भाष्य केलं आहे. बदल्यांमागील कारणांचा उलगडा करताना शिवसेनेनंही भाजपवरही निशाणा साधला आहे.
काय लिहिले आहे अग्रलेखात?
मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांना बदलले म्हणजे ते गुन्हेगार ठरतात असे नाही . मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची सूत्रे त्यांनी अत्यंत कठीण काळात हाती घेतली. कोरोना संकटाशी लढण्यासाठी त्यांनी पोलिसांत जोश निर्माण केला. टीआरपी घोटाळय़ाची फाईल त्यांच्याच काळात उघडली. परमबीर सिंग यांच्यावर दिल्लीतील एका विशिष्ट लॉबीचा राग होता तो याच कारणांमुळे. त्यांच्या हाती जिलेटिनच्या 20 कांडय़ा सापडल्या. त्या कांडय़ांचा स्फोट न होताच पोलीस दलास हादरे बसले. नवे आयुक्त हेमंत नगराळे यांना हिमतीने व सावधगिरीने काम करावे लागेल.
मुंबईच्या कार्माइकल रोडवर वीस जिलेटिन कांडय़ा ठेवलेली गाडी मिळाली. त्या कांडय़ांचे स्फोट झाले नाहीत, पण राजकारणात आणि प्रशासनात मात्र गेले काही दिवस या कांडय़ा स्फोट घडवीत आहेत. या सर्व प्रकरणात आता मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना पदावरून जावे लागले आहे. राज्याचे पोलीस महासंचालक असलेले हेमंत नगराळे हे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त झाले आहेत, तर रजनीश शेठ हे पोलीस महासंचालकपदी आले आहेत. ज्याला आपण साधारण बदल्या म्हणतो तशा या बदल्या नाहीत. एका विशिष्ट परिस्थितीत सरकारला ही उलथापालथ करावी लागली आहे. नवे पोलीस आयुक्त नगराळे यांनी ताबडतोब सांगितले आहे, ‘‘पोलिसांकडून आधी ज्या चुका घडल्या आहेत त्या पुन्हा होणार नाहीत. पोलिसांची प्रतिष्ठा सांभाळली जाईल.’’
नगराळे यांचे हे विधान महत्त्वाचे आहे. मुकेश अंबानी यांच्या घराच्या परिसरात सापडलेली संशयास्पद गाडी व त्यानंतर गाडीमालक मनसुख हिरेन याचा संशयास्पदरीत्या आढळलेला मृतदेह हा प्रकार नक्कीच चिंताजनक आहे. विरोधी पक्षाने या प्रकरणी काही प्रश्न उपस्थित केले हे खरे, पण राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असतानाच ‘एनआयए’ने घाईगडबडीत तपासाची सूत्रे हाती घेतली. महाराष्ट्र सरकारला कुठे बदनाम करता आले तर पाहावे यापेक्षा वेगळा ‘उदात्त’ हेतू त्यामागे नसावा. गुन्हे शाखेतील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या भोवतीच हे प्रकरण फिरत आहे व त्यामागचा हेतू लवकरच समोर येईल. कोणत्याही परिस्थितीत यामागे दहशतवादाच्या तारा जुळलेल्या नसताना या गुन्हय़ाच्या तपासासाठी एनआयएने घूसावे हा काय प्रकार आहे?
दहशतवादासंदर्भातील प्रकरणाचा तपास ‘एनआयए’ करीत असते; पण या जिलेटिनच्या कांडय़ांचा तपास करणाऱया ‘एनआयए’ने उरी हल्ला, पठाणकोट हल्ला व पुलवामा हल्ल्यात काय तपास केला, कोणते सत्यशोधन केले, किती गुन्हेगारांना अटक केली हेसुद्धा रहस्यच आहे. पण मुंबईतील वीस जिलेटिन कांडय़ा हा ‘एनआयए’साठी मोठाच आव्हानाचा विषय ठरताना दिसत आहे. या सर्व प्रकरणातील घडामोडींचे श्रेय राज्यातील विरोधी पक्ष घेत आहे. अटकेत असलेले फौजदार वाझे यांच्यामागचे खरे सूत्रधार कोण? वगैरे प्रश्न त्यांनी विचारले आहेत. मनसुख हिरेन याचा संशयास्पद मृत्यू झाला व त्याबद्दल सगळय़ांनाच दुःख आहे.
भारतीय जनता पक्षाला जरा जास्तच दुःख झाले आहे, पण याच पक्षाचे एक खासदार रामस्वरूप शर्मा यांचा संसदेचे अधिवेशन सुरू असताना दिल्लीत संशयास्पद मृत्यू झाला आहे. शर्मा हे प्रखर हिंदुत्ववादी विचारांचे होते. त्यांच्या संशयास्पद मृत्यूबद्दल भाजपवाले छाती बडवताना दिसत नाहीत. मोहन डेलकरांच्या आत्महत्येबाबत तर कोणी ‘ब्र’ काढायला तयार नाही. सुशांतसिंह राजपूत व त्याच्या कुटुंबीयांना तर सगळेच विसरून गेले आहेत. एखाद्याच्या मृत्यूचे भांडवल कसे करायचे हे सध्याच्या विरोधी पक्षाकडूनच शिकायला हवे. मुंबई पोलिसांचे मनोधैर्य खच्ची करण्याचे प्रयत्न या काळात सुरू आहेत. विरोधी पक्षाने निदान एवढे पाप तरी करू नये.
विरोधी पक्षाने महाराष्ट्रात सत्तेवर येण्याचे स्वप्न बाळगले असेल तर तो त्यांचा प्रश्न, पण हे असे उपद्व्याप केल्याने त्यांना पुन्हा सत्तेच्या खुर्च्या मिळतील हा भ्रम आहे. पोलिसांसारख्या संस्था राज्याचा कणा असतात. त्याची प्रतिष्ठा सगळय़ांनीच सांभाळायची असते. विरोधी पक्ष महाराष्ट्राशी इमान राखून असेल तर ते पोलिसांची प्रतिष्ठा पणास लावून राजकारण करणार नाहीत. मनसुख प्रकरणामागचे पॉलिटिकल बॉस कोण, हा त्यांचा प्रश्न आहे. याचे उत्तर त्यांनीच शोधावे. पण अशा प्रकरणात कोणीच पॉलिटिकल बॉस नसतो.
महाराष्ट्राची ही परंपरा नाही. मनसुखची हत्या झाली असेल तर गुन्हेगार सुटणार नाहीत. त्याने आत्महत्या केली असेल तर त्यामागच्या कारणांचा शोध घेतला जाईल व त्यासाठीच मुंबईसह राज्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल केले आहेत. विरोधी पक्षाने याची खात्री बाळगावी. मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांना बदलले म्हणजे ते गुन्हेगार ठरतात असे नाही. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची सूत्रे त्यांनी अत्यंत कठीण काळात हाती घेतली.
कोरोना संकटाशी लढण्यासाठी त्यांनी पोलिसांत जोश निर्माण केला. धारावीसारख्या भागात ते स्वतः जात राहिले. सुशांत, कंगनासारख्या प्रकरणी त्यांनी पोलिसांचे धैर्य ढळू दिले नाही. त्यामुळे पुढे या प्रकरणात सीबीआय आली तरी मुंबई पोलिसांच्या तपासापुढे सीबीआयला जाता आले नाही. टीआरपी घोटाळय़ाची फाईल त्यांच्याच काळात उघडली. परमबीर सिंग यांच्यावर दिल्लीतील एका विशिष्ट लॉबीचा राग होता तो याच कारणांमुळे. त्यांच्या हाती जिलेटिनच्या 20 कांडय़ा सापडल्या. त्या कांडय़ांचा स्फोट न होताच पोलीस दलास हादरे बसले. नवे आयुक्त हेमंत नगराळे यांना हिमतीने व सावधगिरीने काम करावे लागेल.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.