HW News Marathi
महाराष्ट्र

सेंद्रिय उत्पादनांना प्रोत्साहन देताना ग्राहकांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी! – डॉ.राजेंद्र शिंगणे

मुंबई । सेंद्रिय उत्पादनांना प्रोत्साहन देत असतांनाच ग्राहकांची फसवणूक होणार नाही याची काळजी घेतली जावी यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे सहकार्य केले जाईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला कृषिमंत्री दादाजी भुसे, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, पशु संवर्धन व दुग्ध विकासमंत्री सुनील केदार उपस्थित होते.

महा ऑर्गनिक ॲण्ड रेसिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशन (मोर्फा) महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या समवेत सेंद्रिय अणि विषमुक्त शेतीविषयक अन्न व औषध प्रशासन विभागाशी संबधित विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, पदुमचे प्रधान सचिव जे.पी गुप्ता, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव विजय सौरभ, आयुक्त डॉ. परिमल सिंग याच्यासह पदुम आयुक्त, कृषि आयुक्त, सहकार आयुक्त, एफ. एस. एस. ए. आय. च्या संचालक प्रिती चौधरी, मोर्फाचे अध्यक्ष अंकुश पडवळ, उपाध्यक्ष स्वाती शिंगाडे, सचिव प्रल्हाद वरे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.

डॉ. शिंगणे म्हणाले, बाजारात अनेक अन्न पदार्थ सेंद्रिय पदार्थ म्हणून विकले जातात मात्र ज्याच्या वेष्टनावर सेंद्रिय अन्नपदार्थ लिहिलेले असते त्यात तसे पदार्थ आहेत अथवा नाही याची खात्री नसते, त्यामुळे या पदार्थांवर नियंत्रण आणण्यासाठी अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी अन्न सुरक्षा व मानदे नियमन तयार केले आहे. यात जे अन्न पदार्थ सेंद्रिय अन्नपदार्थ म्हणून पॅक करुन विक्री केली जाते त्या प्रत्येक पदार्थाला NPOP सर्टिफिकेशन यंत्रणेचे प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. तसेच यावर ‘जैविक भारत’ चा लोगो स्पष्टपणे छापलेला असावा, असे नियम आहेत. सदर नियमांची अन्न व औषध प्रशासना (FDA) मार्फत काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल. वेळोवेळी विशेष मोहिमा राबवून नकली सेंद्रीय उत्पादनावर कारवाई केली जाईल. जनतेला अधिकृत सेंद्रिय उत्पादने मिळणेबाबत योग्य त्या उपाययोजना केल्या जातील असेही त्यांनी सांगितले.

राज्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल आश्वासक – कृषिमंत्री दादाजी भुसे

सेंद्रिय शेतीची वाटचाल आश्वासक असून देशात सेंद्रिय उत्पादनात राज्याचा दुसरा क्रमांक आहे, अशी माहिती कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिली. ते म्हणाले, परंपरागत शेती सोबतच कृषि विभागातर्फे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. सेंद्रिय शेतीच्या प्रमाणिकरणासाठी अनेक विभागांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. यासाठी सेंद्रिय शेतीसाठीचा स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याच्या मागणीवर सकारात्मक विचार करण्यात येईल. अन्न प्रकिया व्यवसायाला चालना देण्यात येत आहे. शेतमालाला चांगला भाव मिळावा त्याच बरोबर इतर अपारंपरिक भाजीपाल्याची ग्राहकांना ओळख व्हावी, यासाठी आयोजित केलेल्या रानभाज्या महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचेही भुसे यांनी सांगितले.

गृहनिर्माण संस्थांमधून सेंद्रिय उत्पादनासंबधी जनजागृती करणार – सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

सेंद्रिय उत्पादनाला योग्य ग्राहकापर्यंत पोहोचविण्यासाठी सहकार व पणन विभागातर्फे गृहनिर्माण संस्थांमधून जनजागृती करुन उत्पादनाविषयी माहिती दिली जाईल, असे सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. याशिवाय पणन विभागाने सुरु केलेल्या ऑनलाईन विक्री प्लॅटफॉर्मसवर या उत्पादनांना विक्रीसाठी ठेवता येईल. त्याचबरोबर विक्री मेळावे, प्रदर्शन आणि इतर उपक्रमांतून सेंद्रिय उत्पादनांबाबत प्रबोधन करता येईल असेही पाटील म्हणाले.

पशुंच्या उत्तम वाढीसाठी सेंद्रिय चारा उपयुक्त – पशु संवर्धन व दुग्धव्यवसायमंत्री सुनील केदार

राज्यातील शेतकऱ्यांना दुधाचे उत्तम उत्पादन मिळावे यासाठी पशुंना सेंद्रिय चारा दिल्यास उपयुक्त ठरेल यासाठीचा प्रस्ताव विभागामार्फत तयार करण्याची तयारी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायमंत्री सुनील केदार यांनी दाखवली आहे. यासाठी मोर्फाच्या सदस्यांसोबत स्वतंत्र बैठक घेण्यात येणार आहे. कोरोना नंतर प्रथिनयुक्त आहारांचे महत्त्व लोकांना पटल्यामुळे दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढली आहे तसेच याविषयावर जनजागृती होत आहे, असे केदार यांनी सांगितले.

सेंद्रिय व विषमुक्त शेती या विषयावर अन्न व औषध प्रशासन, सहकार पणन, पशु संवर्धन व दुग्ध विकास, तसेच कृषी विभागाची संयुक्त बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत सेंद्रिय शेती धोरण, सेंद्रिय शेतमालाची विपणन व्यवस्था व इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सभागृहात कसं वागायचं हे शिकवा यांना…” फडणवीस भडकले

News Desk

मुंबई महापालिकेच्या निवडणुका २ वर्षे पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव, आशिष शेलारांचा गंभीर आरोप

News Desk

एसटी महामंडळाच्या तिकीटात १५ जूनपासून १८ टक्के वाढ

swarit