मुंबई | दिल्लीच्या सीमेवर गेल्या १२ दिवसांपासून हजारो शेतकरी केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. उद्या (८ डिसेंबर) भारत बंदची हाकही देण्यात आली आहे. अशा स्थितीत देशभरातून शेतकऱ्यांना राजकीय पक्ष पाठिंबा देत असले तरी राजकारण देखील पाहायला मिळत आहे. माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं ऑगस्ट२०१० मध्ये दिल्लीच्या तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना लिहिलेलं एक पत्र समोर आलं आहे. या पत्रात शरद पवार यांनी कृषी कायद्यात मोठ्या बदलाची गरज व्यक्त केली होती.
दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात आणि कृषी कायद्याच्या विरोधात शरद पवार यांनी राष्ट्रपती रामनाक कोविंद यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र, UPA सरकारच्या काळात केंद्रीय कृषीमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळत असताना त्यांनी कृषी कायद्यात मोठ्या बदलाची गरज व्यक्त केली होती. अनेक राज्यांना त्यांनी तशा आशयाचे पत्र लिहिले होते. ऑगस्ट २०१० मध्ये त्यांनी दिल्लीच्या तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना लिहिलेलं एक पत्र सध्या समाज माध्यमांमध्ये फिरत आहे. असे पत्र त्यांनी२००५, २००७, २०१० आणि २०११ मध्येही लिहिली आहेत.
११ ऑगस्ट २०१० मध्ये शरद पवार यांनी शीला दीक्षित यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी कृषी कायद्यात बदलाची गरज व्यक्त केली आहे. कृषी क्षेत्रात खासगी कंपन्यांच्या सहभागाची गरज असल्याचं पवार म्हणाले होते. इतकच नाही तर सध्या ज्या APMC वरुन मोठा विरोध पाहायला मिळत आहे, शरद पवार यांनी २०१० मध्येच APMC कायद्यात बदल गरजेचा असल्याचं म्हटलं होतं. तसंच २००५ आणि २००७ मध्ये लिहिलेल्या पत्राचीही आठवण करुन दिली होती.
शरद पवार यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनाही नोव्हेंबर २०११ मध्ये पत्र लिहिलं होतं. त्यात कृषी कायद्यातील सुधारणांसह खासगी गुंतवणूक आणि APMC कायद्यातील बदलाची गरज बोलून दाखवली होती. त्याचबरोबर सरकारी बाजार समित्यांसह खासगी बाजाराची गरजही पवार यांनी व्यक्त केली होती.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना आमचा सरसकट विरोध नाही. मात्र, शेतकऱ्यांच्या मालाला किंमत १०० टक्के मिळाली पाहिजे. त्याबाबत बंधन असलं पाहिजे. नव्या कायद्यात सक्तीचा अभाव आहे. त्याबाबत उत्तर भारतातील शेतकऱ्यांच्या भावना तीव्र असल्याचं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं होतं. इतकच नाही तर शरद पवार हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. ९ डिसेंबरला संध्याकाळी ५ वाजता ही भेट होणार असल्याची माहिती मिळत आहे. यावेळी पवार यांच्यासोबत अन्य राजकीय पक्षांचे काही नेते उपस्थित असणार आहेत.
पवारांच्या पत्रावरुन गैरसमज पसरवण्याचं काम- मलिक
शरद पवार यांनी कृषीमंत्रीपदाच्या कार्यकाळात कृषी सुधारणांबाबत लिहिलेली पत्र आता समाज माध्यमांमध्ये फिरत आहेत. त्यावर पवारांनी UPA च्या काळात लिहिलेल्या पत्राचा आधार घेत गैरसमज पसरवला जात असल्याचा आरोप अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. ‘पटत असेल तर तुमच्या राज्यात कायदा लागू करा असं त्या पत्रात नमूद केलं होतं. ते बंधनकारक नव्हतं, फक्त सूचना होत्या. पण आता जे कायदे करण्यात आले आहेत, ते लागू करण्याचं बंधन राज्यांना घालण्यात आलं आहे. कुठलीही चर्चा न करता, घाईगडबडीत हा कायदा लागू केला गेला. भाजपचा लोकांना कायदा काय आहे हेच समजत नाही. सूचना करणं आणि लादणं यात फरक असतो’, असं अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक म्हणाले. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा यू टर्न घेणारा पक्ष नाही, असंही मलिक यांनी आवर्जुन सांगितलं आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.