मुंबई | भारताच्या सीमेवरील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांच्या हल्ल्यात भारताचे २० जवान शहीद झाले भारत आणि चीनदरम्यान असलेला तणाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सामनाच्या अग्रलेखातून आज (१९ जून) भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. सामनात म्हटले, मोदी म्हणतात, “डिवचल्यास उत्तर देऊ. 20 जवानांना हाल हाल करून मारले हे डिवचणे नाही तर काय?,” असा सवाल उपस्थित करत भाजप सरकारवर टीका केली आहे.
“नेहरूंच्या काळात चिन्यांशी लढताना आमचे सैनिक विषम स्थितीत होते. साधे कॅनव्हासचे बूट, शस्त्र-गोळ्यांची टंचाई, अनोळखी प्रदेश अशी तेव्हा परिस्थिती होती. आज सर्वकाही आहे, पण तरीही चिन्यांनी आमच्या जवानांचे क्रूर बळी घेतले. पंडित नेहरूंना दोष देणार्यांनी आत्मपरीक्षण केले तरी 20 जवानांचे बलिदान सार्थकी लागेल” असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.
सामनाचा आजचा अग्रलेख
मोदी म्हणतात, डिवचल्यास उत्तर देऊ. 20 जवानांना हाल हाल करून मारले हे डिवचणे नाही तर काय? नेहरूंच्या काळात चिन्यांशी लढताना आमचे सैनिक विषम स्थितीत होते. साधे कॅनव्हासचे बूट, शस्त्र-गोळ्यांची टंचाई, अनोळखी प्रदेश अशी तेव्हा परिस्थिती होती. आज सर्वकाही आहे, पण तरीही चिन्यांनी आमच्या जवानांचे क्रूर बळी घेतले. पंडित नेहरूंना दोष देणार्यांनी आत्मपरीक्षण केले तरी 20 जवानांचे बलिदान सार्थकी लागेल!
चिनी माकडांनी हिंदुस्थानी जवानांना हाल हाल करून मारले हे आता स्पष्ट झाले. चिनी लोक नरभक्षक आहेत का, ते सांगता येत नाही. पण कोरोना विषाणूचा प्रसार चीनच्या मासळी-मांस बाजारातून झाला. तेथे शोध घेतला तेव्हा असे समजले की, चिनी लोकांचे खाणेपिणे म्हणजे नरभक्षकाला लाजवणारेच आहे. ते वटवाघुळ, पाली, झुरळे, अजगर, साप, मगरी, कुत्रे, लांडगे वगैरे रानटी पशु-पक्षी चवीने खातात. त्यामुळेच क्रौर्य त्यांच्या नसानसात भिनले आहे. चिन्यांनी गलवान खोऱयात आमच्या सैनिकांना घेरले, अपहरण केले व काटेरी तारांच्या दांडक्यांनी निर्घृणपणे मारले. हिंदुस्थानचे जवान गाफील होते व चिन्यांचा हल्ला अचानक झाला. यापूर्वी पाकिस्तानी सैनिकांनी कश्मीरात आमच्या जवानांची मुंडकी कापून नेली. तेव्हा एकाच्या बदल्यात पाकड्यांची दहा मुंडकी उडवून आणू असे आपण सगळेच ओरडत होतो. सौरभ कालियाचे प्रकरणही विसरता येणार नाही. बांगलादेशच्या सीमेवरही आमच्या जवानांना अशाच निर्घृण पद्धतीने मारले होते. आता चिनी माकडांनी आमच्या 20 जवानांना अत्यंत अमानुषपणे मारले. 150 पेक्षा जास्त जवान जखमी व अत्यवस्थ आहेत. पंतप्रधान मोदी यांनी आता घाईघाईने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मोदी यांनी त्याआधी दिल्लीतून असेही निवेदन केले की, ‘हिंदुस्थान कधीही अखंडतेशी तडजोड करणार नाही. जर आम्हाला कोणी डिवचण्याचा प्रयत्न केला तर त्याला योग्य उत्तर देऊ!’पंतप्रधान असेही सांगत आहेत की, ‘हिंदुस्थान आपला स्वाभिमान आणि एक एक इंच जमिनीचे संरक्षण करेल.’ मोदी म्हणतात, डिवचल्यास उत्तर देऊ. 20 जवानांना हाल हाल करून मारले हे डिवचणे नाही तर काय? इतर स्वाभिमानी देश, एका जवानावर हल्ला झाला तरी देशाच्या स्वाभिमानावर हल्ला झाला असे समजून बदला घेतात. तेव्हा आपल्या 20 जवानांना चिन्यांनी ठार केले हे डिवचणेच आहे.
स्वाभिमान आणि अखंडतेवर
सगळ्यात मोठा हल्ला आहे. 20 जवानांच्या शवपेट्या देशात येणे ही काही स्वाभिमान किंवा गौरवाची गोष्ट नाही. आमच्या जवानांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही असे आता सांगण्यात आले. हीच आपली परंपरा आहे. पण चिनी सैन्याने केलेला हल्ला हा 1962 इतकाच भयंकर आणि घातकी आहे. चीनला सडेतोड उत्तर देण्याची भाषा तेव्हाही झाली व आजही सुरू आहे. पण आपण फक्त पाकड्यांनाच धमकावू शकतो. चीनला अंगावर घेण्यास आपण असमर्थ आहोत या भ्रमातून देशाला कसे बाहेर काढणार? ज्या ट्रम्प यांच्यासाठी मोदी यांनी चीनशी पंगा घेतला आहे ते ट्रम्प म्हणे व्हाईट हाऊसमध्ये बसून हिंदुस्थान-चीन तणावावर लक्ष ठेवून आहेत. त्याने काय होणार? पाकिस्तानबरोबरचे युद्ध 1971 साली झाले व अमेरिका पाकिस्तानला मदत करण्याचे चित्र समोर आले तेव्हा रशियाने त्यांचे सातवे आरमार इंदिरा गांधींच्या मदतीसाठी पाठवले. त्याबरोबर अमेरिकेने माघार घेतली. प्रे. ट्रम्प त्यांचे मित्र मोदी यांच्या मदतीसाठी अशी काही ताकद पाठवणार आहेत काय? ही चीनबरोबरची लढाई आपली आपल्यालाच लढावी लागेल व त्यादृष्टीने तयारी करावी लागेल. चीनला धडा शिकवण्यासाठी सीमेवर जवानांची मोर्चेबांधणी वगैरे ठीक आहे. हवाई दलही तैनात केले. रणगाडे नेऊन ठेवले हे सर्व तर जागेवर राहीलच, पण चीनची आर्थिक कोंडी करणे तर काही प्रमाणात नक्कीच शक्य आहे. चीनकडून आपल्या देशात येणाऱया हजारो वस्तूंवर बहिष्कार टाकायला हवा. पण ही स्वदेशी जागृती दाखवायची जनतेने. मात्र ज्या अनेक चिनी कंपन्या हिंदुस्थानात पसरल्या आहेत त्यांचे काय करणार आहात? महाराष्ट्रातून जरी एखादी चिनी कंपनी हद्दपार केली गेली तरी तिच्याशी दुसरे एखादे राज्य करार करू शकते. तेव्हा हिंदुस्थानातील चिनी कंपन्यांबाबत केंद्र सरकारनेच एक राष्ट्रीय धोरण आखण्याची गरज आहे. दोन देशांत सहा लाख कोटींचा व्यापार होतो. गुंतवणूक व रोजगार दोन्ही बाजूला आहे, पण फायदा जास्त चीनलाच होतो आहे. दोन देशांत
चांगले संबंध
निर्माण होत असतानाच ते बिघडण्याचे काम अमेरिकेमुळे झाले. चीन हा आमचा सगळय़ात महत्त्वाचा शेजारी आहे हे विसरता येणार नाही. पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंकेसारखे शेजारी हिंदुस्थानला जुमानत नाहीत. तेथे हिंदुस्थान-अमेरिकेची मैत्री सुरू झाली म्हणून चीनसारखे राष्ट्र मागे हटेल असे होणार नाही. मोदी हे पंतप्रधान झाल्यावर जगभरात गेले. पण रशिया किंवा इस्राएलसारख्या राष्ट्रांनीही चीनबरोबरच्या संघर्षात हिंदुस्थानची बाजू घेतली नाही. तुमचे आपसातले भांडण तुम्ही मिटवा हाच त्यांचा संदेश आहे. कोणत्याही राष्ट्राचे परराष्ट्रीय धोरण त्याच्या शेजारी राष्ट्रांसंबंधीच्या धोरणावरच निश्चित होत असते. चीन आणि पाकिस्तान यांच्या धोरणांची दखल घेऊनच आपल्याला विदेश धोरणाची दिशा निश्चित केली पाहिजे. कारण हिंदुस्थानविरोध या समान भूमिकेवरून ही दोन राष्ट्रे एक झाली आहेत. त्यामुळे या राष्ट्रांपैकी कोणत्याही एका राष्ट्राशी संघर्ष निर्माण झाला तर आपल्याला त्या दोघांविरुद्ध लढावे लागणार आहे हे ध्यानात ठेवले पाहिजे. आपण आपली संरक्षण सिद्धता कितीही वाढवली तरी आपल्याला एकाच वेळी दोन आघाड्यांवर लढता येणार नाही. संरक्षण आणि परराष्ट्र या दोन महत्त्वाच्या खात्यांतील अविभाज्य संबंधांचे आपल्याला विस्मरण झाले आणि त्यापायीच 1962 च्या ऑक्टोबरमध्ये चीनने एक धक्का देताच आपली नामुष्की झाली. त्या चुकीचे खापर आपण पंडित नेहरूंवर फोडत राहिलो. पण त्या चुकीपासून आजच्या राज्यकर्त्यांनी धडा घेतला असे दिसत नाही. संरक्षण-परराष्ट्र धोरणासंदर्भात त्याच मनमानी चुका करून आपण आपल्या 20 जवानांचे बळी घेतलेत व चीनलाही अंगावर ओढून घेतले. नेहरूंच्या काळात चिन्यांशी लढताना आमचे सैनिक विषम स्थितीत होते. साधे कॅनव्हासचे बूट, शस्त्र-गोळय़ांची टंचाई, अनोळखी प्रदेश अशी तेव्हा परिस्थिती होती. आज सर्वकाही आहे, पण तरीही चिन्यांनी आमच्या जवानांचे क्रूर बळी घेतले. पंडित नेहरूंना दोष देणाऱयांनी आत्मपरीक्षण केले तरी 20 जवानांचे बलिदान सार्थकी लागेल!
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.