HW News Marathi
महाराष्ट्र

लाड यांचा काँग्रेस नेत्यांवर ५०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा

मुंबई | सोमवारी काँग्रेसच्या नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत लाड यांच्यावर नवी मुंबई येथील भूखंड खरेदीसाठी बेकायदेशीरपणे बिल्डरला मदत केल्याचा आरोप केला होता. त्या अनुषंगाने लाड यांनी मुंबई उच्च न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी काँग्रेस नेत्यांवर तब्बल ५०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे. भूखंड घोटाळ्याचे आरोप लावून बदनामी केल्याचं लाड यांनी म्हटलं आहे. नवी मुंबईतील सिडकोच्या २४ एकर जागेत मोठा भूखंड झाल्याचा आरोप काँग्रेसने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर केला होता. काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वाराज चव्हाण, काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेत हा आरोप केला होता. यावरुन भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आता त्यांच्याविरोधात ५०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे.

“मूळात या आरोपाला कोणताही आधार किंवा पुरावे नसताना केवळ खोट्या माहितीच्या आधारावर नाहकपणे माझ्यावर आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले होते. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर फक्त वातावरण निर्मितीसाठीचा काँग्रेसचा हा केविलवाणा प्रयत्न होता”,असं प्रसाद लाड म्हणाले.

“मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढले हा काही कोणताही घोटाळा केल्याचा पुरावा असू शकत नाही. माझी अनेक नेत्यांशी आणि व्यावसायिकांशी मैत्री आहे, याचा अर्थ मी त्यांच्या व्यवसायात भागीदार आहे असा होत नाही, तरीही आरोपांबाबत कोणतीही खातरजमा न करता निव्व्ळ मानसिक त्रास देण्याच्या हेतूने, तसेच सामाजिक पत घसरवून माझ्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का देण्याच्या दुष्ट हेतूने हे आरोप करण्यात आले आहेत”, असा दावा प्रसाद लाड यांनी केला. याशिवाय माझ्यावरील आरोपाच्या माध्यमातून सरकारच्या प्रतिमेला धक्का देण्याचाही हा प्रयत्न आहे. त्यामुळे नाईलाजास्तव मला हा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करावा लागत आहे.

या दाव्याबाबत काँग्रेस नेत्यांना नोटीस बजावण्यात येणार असून, ही नोटीस मिळाल्यापासून तीन दिवसांच्या आत त्याबाबतचा खुलासा करावा. किंवा २ जुलै रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेतील वक्तव्ये आणि आरोप बिनशर्त मागे घेऊन माझी तसेच राज्य सरकारची माफी मागावी, अन्यथा कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे असे आव्हान आमदार प्रसाद लाड यांनी दिले आहे.

Related posts

राज्यातल्या प्रोड्यूसर्संना मुख्यमंत्र्यांनी दिल्या विशेष सूचना!

News Desk

शिवसंपर्क अभियानात तोतया आमदार प्रकरणी शिवसेनेविरूद्ध ‘420’ दाखल करा!

News Desk

शिर्डीत ड्रेसकोडवरुन वातावरण तापलं, फलक काढण्यासाठी तृप्ती देसाई आज शिर्डीत

News Desk