मुंबई । राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आमदार निलेश लंके यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. “निलेश लंके यांनी संकटाच्या काळात दुःख वाटून घेतले आहे. माणुसकीचं नातं कसं जपावं हे त्यांनी दाखवले. शरद पवार यांचा कार्यकर्ता म्हणून ते शोभतात. जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा शरद पवार सामान्यांसाठी धावून जातात त्याचप्रमाणे निलेश लंके काम करत आहेत”, अशा शब्दात जयंत पाटील यांनी निलेश लंके यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. पारनेर तालुक्याच्या भावळणी येथील लंके यांनी उभारलेल्या शरद पवार आरोग्य मंदिर कोविड सेंटरला जयंत पाटील यांनी भेट दिली.
जयंत पाटील यावेळी बोलताना म्हणाले की, “काही दिवसांपासून फक्त ऐकूनच होतो. मात्र आज भेट दिल्याने आमदार निलेश लंके यांचा अभिमान वाटतो. सर्वांची सेवा करण्याचा ‘पण’ त्यांनी घेतला आहे. १४ एप्रिलपासून झोकून काम करत आहे. लोकांचा आदर्श म्हणून ते उभे राहिले आहे. त्यांनी महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. सामान्य माणसाची चांगली सेवा आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून होत आहे”, असे म्हणत जयंत पाटील यांनी निलेश लंके यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.
२ दिवसांपूर्वी जलसंपदा विभागाच्या बैठकीदरम्यान आमदार निलेश लंके यांनी मंत्री जयंत पाटील यांना कोविड सेंटरला भेट देण्याची विनंती केली होती. आमदार निलेश लंके यांच्या या विनंतीला मान देत जयंत पाटील पारनेरमध्ये दाखल झाल्याने आमदार निलेश लंके भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.