HW News Marathi
देश / विदेश

“मोदींच्या वाराणसीतील सभेत काळ्या टोप्या आणि काळे मास्क उतरवण्यात आले, कलियुग म्हणतात ते हेच का?”

मुंबई | आजच्या (१७ जुलै) सामना अग्रलेखातून राजकीय नेत्यांची सुरक्षाव्यवस्था, त्यांच्या सुरक्षेविषयी घेतली जाणारी काळजी आणि दिवसेंदिवस होत चाललेला अतिरेक, यावर भाष्य करण्यात आलेलं आहे. पंतप्रधान मोदींच्या वाराणसीतील सभेत काळ्या टोप्या आणि काळे मास्क सुरक्षा यंत्रणांनी लोकांना उतरवायला सांगितले. दुसरीकडे अमित शहा यांच्या एका दौऱ्यात सुरक्षा यंत्रणांनी लोकांना घरांच्या दारे, खिडक्या बंद ठेवायला सांगितल्या. यावरुन हे भीतीचेच लक्षण नाही का?, असा सवाल करत कलियुग म्हणतात ते हेच का?, अशी विचारणा करण्यात आलेली आहे.

काय लिहिले आहे अग्रलेखात?

महाराष्ट्रातील काही नेत्यांनाही केंद्रीय सुरक्षा दलाची सेवा पुरवून राज्य व केंद्रात एक दरी निर्माण केली. याचा अर्थ असा की, इतके तगडे व मजबूत नेतृत्व असतानाही देश व जनता सुरक्षित नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणशीतील सभांत काळे मास्क आणि काळय़ा टोप्या उतरवण्यात आल्या हे त्या भयाचेच लक्षण नाही काय? अर्थात राष्ट्रीय नेत्यांच्या सुरक्षेत गलथानपणा नको हे मान्य. आपण दोन पंतप्रधान सुरक्षाव्यवस्थेतील हेळसांडीमुळे गमावले आहेत. त्यामुळे ताकही फुंकून प्यावे लागते व काळय़ा टोप्या आपल्या असल्या तरी उतरवाव्या लागतात. कलियुग, कलियुग म्हणतात ते हेच काय?

सध्या आपल्या देशात सुरक्षेच्या नावाने अतिरेकच सुरू आहे. बरे, ही सुरक्षा कोणाची, तर देशातील पाच-दहा प्रमुख सत्ताधारी राजकीय मंडळींची (काही धनदांडग्यांचीही). पंतप्रधान, राष्ट्रपती, गृहमंत्री यांच्या सुरक्षा व्यवस्थेस प्राधान्य द्यायला हवेच. मात्र अति तेथे माती झाली तर तो टवाळखोरीचाच विषय होतो. आता आपले पंतप्रधान मोदी हे आपल्या स्वतःच्या मतदारसंघात म्हणजे वाराणसीला गेले. तेथे त्यांनी योगी आदित्यनाथ यांचे ‘जमकर’ कौतुक केले. योगी महाराजांनी कोरोनाची दुसरी लाट कशी हिमतीने रोखली वगैरे जाहीरपणे सांगितले (गंगेत कोरोनाग्रस्तांची प्रेते वाहत होती हे विसरून जा.)

पंतप्रधान मोदींचे भाषण वाराणसी येथील बीएचयू, आयआयटी मैदानावर झाले. तेथे काळे कपडे घातलेल्या लोकांना प्रवेशबंदी करण्यात आली. आश्चर्य असे की, पोलिसांनी श्रोत्यांच्या तोंडांवरील काळे मास्कही काढायला लावले. म्हणजे त्या गर्दीत बरेच लोक ‘मास्क’शिवाय बसले. कारण तोंडावरचे काळे मास्क खेचून काढले. काळे मास्क काढण्याचे कारण काय? तर पंतप्रधानांची सुरक्षा! जगभरात दोन रंगांचेच मास्क जोरात चालले आहेत. पांढरे आणि काळे! आपल्या देशात पंतप्रधानांच्या सभांना यापुढे ‘काळे’ मास्क चालणार नाहीत, असा अप्रत्यक्ष आदेश पंतप्रधानांच्या सुरक्षा यंत्रणांनी दिला आहे.

आता हे मास्कचे प्रकरण थोडे बाजूला ठेवा. वाराणसीच्या या सोहळय़ात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोकही त्यांच्या गणवेषात मोठय़ा कौतुकाने हजर होते. त्या स्वयंसेवकांच्या डोक्यावरच्या काळय़ा टोप्याही सुरक्षा रक्षकांनी काढायला लावल्या. पंतप्रधानांनी काही वर्षांपूर्वी मंत्र्यांच्या डोक्यावरची लाल बत्ती काढली. हे काही बरे झाले नाही. आता सुरक्षा रक्षकांनी संघाची काळी टोपी काढली. ऐकावे ते नवलच असा हा प्रकार आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेत कोणतीही खोट असू नये, पण तोंडावरील मास्क व डोक्यावरील काळय़ा टोप्याही काढायला लावणे हा प्रकार जरा जादाच झाला, असे कदाचित पंतप्रधान मोदींनाच वाटले असेल. मास्कच्या आड आणि काळय़ा टोपीखाली दडलंय काय, असा प्रश्न पंतप्रधानांच्या सुरक्षा यंत्रणेस पडला असावा.

हे सर्व उपद्व्याप करण्याआधी सरकारने एकच करावे, एक अध्यादेश काढून काळे मास्क व काळय़ा टोप्या यावर बंदीच घालावी. नाही तरी देशद्रोहाचा कायदा आपल्या देशात स्वस्त झालाच आहे. सर्वोच्च न्यायालयानेच देशद्रोहाच्या कायद्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले असले तरी सरकार मागे हटणार नाही. काळा मास्क, काळी टोपी घालणे हा गुन्हा नाही, तर राष्ट्राला धोका ठरत असल्याने काळी टोपीवाल्यांवर देशद्रोहाचे मुकदमे ठोकू, असा आदेश काढून मोकळे व्हावे. वाराणसी हे पवित्र धार्मिक स्थळ आहे. देवाच्या द्वारी जीवन-मरणाचे कसले भय बाळगायचे? पंतप्रधान, राष्ट्रपती, गृहमंत्री असे अति व्हीआयपी लोक तीर्थक्षेत्री येतात तेव्हा माणसांनाच काय, तर देवांनाही बंदी केले जाते.

आपले गृहमंत्री मागच्या आठवडय़ात अहमदाबादच्या बेजलपूर भागात एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी गेले. गृहमंत्री शहा यांना ‘झेड प्लस’ दर्जाच्या वरची सुरक्षाव्यवस्था आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांच्या आगमनाआधी स्थानिक पोलिसांनी एक फर्मान जारी केले. या भागात उंच इमारतीत राहणाऱया सोसायटय़ांना स्थानिक पोलिसांनी आपापल्या घराच्या खिडक्या-दरवाजे बंद ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. अर्थात पोलिसांच्या म्हणण्यानुसार ही एक सामान्य प्रक्रिया आहे. या सामान्य प्रक्रियेतूनच मोठय़ा नेत्यांच्या आगमनाविषयी सामान्य लोकांत नाराजीची भावना निर्माण होते. गृहमंत्री शहा यांना देशातील सर्वोच्च दर्जाची सुरक्षाव्यवस्था आहे.

गृहमंत्र्यांभोवती 50 सुरक्षा रक्षक कायम तैनात असतात. यात नॅशनल सिक्युरिटी गार्डस्, स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप्सचे कमांडो असतातच. शिवाय आयटी बीपी, सीआरपीएफचे जवानही त्यांच्या सुरक्षेत आहेत. इतकी कडेकोट सुरक्षा असूनही लोकांनी दारे-खिडक्या बंद करून घरात बसावे व लाडक्या नेत्यांचे दर्शन घेऊ नये. खिडकीतून अभिवादन करू नये, असे फर्मान काढणे हे जरा जास्तच झाले. गेल्या काही दिवसांत राज्याराज्यांतील अनेक फुटकळ नेत्यांनाही केंद्रीय गृहमंत्रालयाने सीआरपीएफची विशेष सुरक्षा पुरवण्याचे काम केले. प. बंगाल निवडणुकीत तर तेथील लहानसहान कार्यकर्त्यांच्या सुरक्षेतही केंद्रीय सुरक्षा पथके लावली. आताही भाजपच्या आमदारांना केंद्रीय सुरक्षा देऊन विनोदाची बहार आणली आहे.

तरीही हे सुरक्षेचे पिंजरे तोडून मुकुल रॉयसह अनेक आमदार तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल झाले. महाराष्ट्रातील काही नेत्यांनाही केंद्रीय सुरक्षा दलाची सेवा पुरवून राज्य व केंद्रात एक दरी निर्माण केली. याचा अर्थ असा की, इतके तगडे व मजबूत नेतृत्व असतानाही देश व जनता सुरक्षित नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीतील सभांत काळे मास्क आणि काळय़ा टोप्या उतरवण्यात आल्या हे त्या भयाचेच लक्षण नाही काय? अर्थात राष्ट्रीय नेत्यांच्या सुरक्षेत गलथानपणा नको हे मान्य. आपण दोन पंतप्रधान सुरक्षाव्यवस्थेतील हेळसांडीमुळे गमावले आहेत. त्यामुळे ताकही फुंकून प्यावे लागते व काळय़ा टोप्या आपल्या असल्या तरी उतरवाव्या लागतात. कलियुग, कलियुग म्हणतात ते हेच काय?

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोव्याच्या मंत्रीमंडळाची आज पुनर्रचना, ४ नव्या मंत्र्यांना मिळणार ‘ही’ जबाबदारी

News Desk

‘ये दिवार तुटती क्यू नही’ अशी म्हणण्याची वेळ विरोधकांवर येणार आहे – अजित पवार

Arati More

चंद्राबाबूंनी खासदारांना भाजपमध्ये पाठवले | वायएसआर काँग्रेस

News Desk