HW News Marathi
महाराष्ट्र

..तर ‘एटीएस’ने आता नाना पटोले यांचीही चौकशी करावी – सामना

मुंबई | पोलीस फडणवीसांना गुप्त माहिती पुरवतात, हे सरकारसाठी शुभसंकेत नाहीत, असा रोखठोक इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. सामनाच्या आजच्या रोखठोक सदरातून त्यांनी फडणवीसांवर आरोपांच्या फैरी झाडत एकप्रकारे महाविकास आघाडीला सावधानतेचा इशारा दिला आहे.

अंबानी परिवाराच्या घराबाहेर एक संशयास्पद गाडी उभी राहते, त्या गाडीचा मालक मनसुख हिरेन याचा संशयास्पद मृत्यू लगेच होतो, विधानसभेत त्यावर चार दिवस गदारोळ होतो हे सर्व रहस्यमय प्रकरण महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढत आहे. या सर्व प्रकरणातील गुप्त माहिती विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्याकडे सगळ्यात आधी पोहोचत राहिली. सरकारसाठी हे शुभसंकेत नाहीत, असं रोखठोकमध्ये म्हटलं आहे.

काय लिहिले आहे सदरात?

अंबानी परिवाराच्या घराबाहेर एक संशयास्पद गाडी उभी राहते, त्या गाडीचा मालक मनसुख हिरेन याचा संशयास्पद मृत्यू लगेच होतो, विधानसभेत त्यावर चार दिवस गदारोळ होतो हे सर्व रहस्यमय प्रकरण महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढत आहे. या सर्व प्रकरणातील गुप्त माहिती विरोधी पक्षनेते श्री. फडणवीस यांच्याकडे सगळय़ात आधी पोहोचत राहिली. सरकारसाठी हे शुभसंकेत नाहीत!

…तर नाना पटोले यांची चौकशी करा

काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे कालपर्यंत विधानसभेचे अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांच्याकडून ठोस व जबाबदारीचे बोलणे अपेक्षित आहे. या सर्व प्रकरणात विधानसभेत त्यांनी काय सांगितले? ‘‘सुरक्षेचे कारण पुढे करून मुकेश अंबानी यांच्या घरावरील हेलिपॅडला परवानगी मिळावी यासाठी भारतीय जनता पक्षानेच स्फोटकांच्या गाडीचे प्रकरण घडवून आणले’’, असे पटोले म्हणाले. पटोले यांच्याकडे याबाबत पुरावे असतील तर ‘एटीएस’ने आता त्यांचीही चौकशी करावी. अंबानी यांना मुंबईतील घराच्या गच्चीवर हेलिकॉप्टर उतरविण्याची परवानगी राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणासाठी आधीच नाकारली आहे व एकटय़ा अंबानी परिवारासाठी राष्ट्रीय सुरक्षा पणास लावावी हे शक्य नाही. पुन्हा अंबानीही ते मान्य करणार नाहीत.

मनसुख हिरेन या व्यावसायिकाच्या मृत्यूने महाराष्ट्राचे राजकारण सध्या ढवळून निघाले. त्या ढवळण्यातून विरोधी पक्षाने काय मिळवले, याचे उत्तर ‘गमावलेला आत्मविश्वास’ असेच द्यावे लागेल. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दीड वर्षात प्रथमच विरोधी पक्षनेता म्हणून सूर सापडला. आठ दिवसांच्या अधिवेशनात संपूर्ण ‘फोकस’ विरोधी पक्षनेत्यांवर राहिला हे सगळय़ात मोठे यश. बुधवारी दुपारी सुधीर मुनगंटीवार सभागृहात आले व म्हणाले, ‘‘पुढच्या तीन महिन्यांत आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ.’’ हा फाजील आत्मविश्वास आहे, सरळ स्वप्नरंजन आहे. पुन्हा सत्तेवर येण्याची भाषा म्हणजे पुन्हा पहाटे किंवा मध्यरात्रीच्या शपथविधीची तयारी. त्यासाठी नवा घोडेबाजार होणार असेल तर भारतीय जनता पक्ष आपली उरलीसुरली प्रतिष्ठाही गमावून बसेल.

महाराष्ट्रात सध्या जे घडते आहे ते राज्याच्या प्रतिष्ठेला शोभणारे नाही. खून, आत्महत्या, मृत्यू, बलात्कार यावर सत्ताधारी आणि विरोधकांत रणकंदन सुरू आहे. पूजा चव्हाण या मुलीच्या संशयास्पद मृत्यूने वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. मनसुख हिरेन याचा मृत्यू हा खून असल्याचे सांगून विरोधी पक्षाने सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्याचा बळी मिळवला, पण अन्वय नाईक व मोहन डेलकर या दोन आत्महत्यांसंदर्भात विरोधी पक्ष काहीच मनापासून बोलायला तयार नाही. मोहन डेलकर हे तर सातवेळा निवडून आलेले खासदार. त्यांनी आत्महत्या केली. संसदेच्या विशेष हक्कभंग समितीसमोर डेलकरांनी सांगितले, दादरा-नगर हवेलीचे प्रशासन माझा अपमान आणि छळ करीत आहे. हे असेच चालू राहिले तर एक दिवस मला आत्महत्या करावी लागेल. श्री. डेलकर यांनी ही आत्महत्या मुंबईत येऊन केली.

संसदेच्या विशेष हक्कभंग समितीसमोर केलेले निवेदन हाच पुरावा मानून गुन्हेगारांवर कारवाई करायला हवी. ती का होत नाही? अंबनीचे महत्व मुकेश अंबानी यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा जीव देशासाठी किती महत्त्वाचा आहे हे देशवासीयांना गेल्या पंधरा दिवसांत नव्याने समजले हे बरे झाले. एका भल्यापहाटे एक स्कॉर्पिओ गाडी अंबानी यांच्या आलिशान निवासस्थानाच्या परिसरात उभी राहते. त्या गाडीबाबत संशय येऊन पोलीस तेथे पोहोचतात. त्या गाडीत जिलेटिनच्या 20 कांडय़ा सापडतात. त्यानंतर एका दहशतवादी संघटनेचा धमकीवजा संदेश मिळतो. अंबानी कुटुंबाला मारण्याचा हा कट असल्याचे त्यावर सांगितले गेले. हा कट असेल तर कोणी केला व अंबानी कुटुंबास ठार करण्याचा कट ‘जैश-उल-हिंद’ने का रचावा? 21 जिलेटिनच्या कांडय़ा व एक स्कॉर्पिओ हा अंबानींसारख्या अतिसुरक्षित व्यक्तीवर हल्ला करण्याचा कट म्हणजे हास्यास्पद प्रकार आहे.

या गाडीचा मालक मनसुख हिरेन हा ठाण्यात राहत होता. त्याने आपली गाडी चोरटय़ांनी पळवली अशी तक्रार ही गाडी अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ आढळून आली त्याच्या आठ दिवस आधी म्हणजे 18 फेब्रुवारी रोजी पोलिसांत दाखल केली. विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या मते गाडीचा मालक मनसुख व सचिन वाझे हे चार महिन्यांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. ज्या मनसुखचा संशयास्पद मृत्यू झाला त्याचा मृतदेह मुंब्य्राच्या खाडीत सापडला हे सर्व प्रकरण म्हणूनच रहस्यमय झाले, पण रहस्य व सत्य यात फरक आहे. विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी गुप्तहेर शेरलॉक होम्सप्रमाणे या प्रकरणाचा तपास केला व काही गोष्टी समोर आणल्या. एखाद्या निष्णात फौजदारी वकिलाप्रमाणे संपूर्ण केस विधानसभेत मांडली.

त्यांचे वकिलीचातुर्य या वेळी वाखाणण्यासारखेच होते, पण फौजदारी वकिलाने खटला कितीही रंगतदार केला तरी न्यायदान हे पुराव्यांवरच केले जाते. मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच विरोधी पक्षनेत्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले, पण हेच पोलीस वर्षभरापूर्वी श्री. फडणवीस यांचे हुकूम ऐकत होते. अर्णब गोस्वामीसारख्यांना पोलिसांनी तेव्हा कोणाच्या हुकूमाने वाचविले? फडणवीस यांनी मनसुख प्रकरणाचे नाटय़ उत्तम रीतीने उभे केले, पण पुढे काय? मनसुख परत आले नाहीत. मनसुख हिरेन हा तावडे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने बोलावले म्हणून घराबाहेर पडला तो परत आलाच नाही. तावडे नावाचे कुणी अधिकारी मुंबई क्राइम बँचच्या कांदिवली युनिटमध्ये कार्यरत नाहीत हे आता समोर आले आहे.

मग या तावडेंच्या फोनचे गौडबंगाल काय? मनसुखचा खून झाला असे त्याची पत्नी सांगते. या सर्व प्रकरणात गुंता आहे. त्या गुंत्यात मुंबई-ठाण्याचे पोलीस व पोलिसांचा एक गट चालवणारी बाहय़ शक्ती गुंतली आहे. यातून पोलीस दलातील ‘गटबाजी’ व सौम्य टोळीयुद्ध पुन्हा उसळू लागले तर ते बरे नाही. पोलिसांनी भ्रष्टाचार करावा, पैसे गोळा करावेत, प्रोटेक्शन मनी घ्यावा यात आता काही नवीन राहिलेले नाही. देशभरातील पोलीस दलाची हीच कार्यपद्धती आहे असे लोक गृहीत धरूनच चाललेले असतात, पण पोलिसांत हिंसा, खंडणीखोरी व प्रसंगी अमली पदार्थांच्या व्यवहारातही पैसे मिळविण्याची प्रवृत्ती वाढीस लागली तर देशच संकटात येईल. एखाद्या खोटय़ा प्रकरणाचा डोलारा उभा करायचा व त्यात बडी नावे गुंतवून पैसे उकळायचे ही प्रवृत्ती सर्वच स्तरांवर वाढली आहे.

पोलिसांचे चारित्र्य त्यामुळे बिघडले. म्हणून मुंबई पोलिसांनी तोंड काळे केले असे वक्तव्य श्री. फडणवीस यांनी केले, त्याचे समर्थन कोणीच करू नये. मनसुख हिरेन प्रकरणात पोलिसांनी तोंड काळे केले असा आरोप विरोधी पक्षनेते करीत असतील तर अन्वय नाईक प्रकरणात कोणी तोंड काळे केले व हा कोळसा पोलिसांना पुरवणारे कोण होते? स्वतःची सुरक्षा मुकेश अंबानी यांच्या घराच्या परिसरात एक स्कॉर्पिओ उभी राहते काय व त्यासंदर्भात एक हत्या घडते काय? ही एक रहस्यकथाच झाली आहे. अंबानी परिवाराला स्वतःची मजबूत सुरक्षा व्यवस्था आहे व त्या सुरक्षा व्यवस्थेत इस्रायलचे सुरक्षा व्यवस्थापक तैनात आहेत. अंबानींची सुरक्षा व्यवस्था जगात सर्वोत्कृष्ट आहे, असे जाणकार सांगतात. श्री. अंबानी यांच्या करंगळीवर देशाच्या अर्थव्यवस्थेचा गोवर्धन तरला आहे. लाखो लोकांना रोजगार ते देतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत कोणतीही कसूर नसावी, पण त्यांच्या सुरक्षेचा हा असा धिंगाणा करून कुणाला त्यांच्याकडून काही आर्थिक व्यवहार करायचे होते काय? अशी शंका काही जण घेतात.

दुसरे असे की, अंबानी परिवाराने एखादी गोष्ट करायची ठरवलीच तर कोणतेही सरकार त्यास विरोध करणार नाही हेही तितकेच खरे आहे. त्या अंबानी परिवाराच्या नावावर काहीही खपवण्याचा प्रयत्न राजकारणी किंवा पोलिसांनी न केलेला बरा. अंबानी यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर जिलेटिनच्या कांडय़ा असलेली गाडी सापडते. अंबानी यांच्या वैयक्तिक सुरक्षेचे बाजूला ठेवा, पण अंबानी यांना केंद्र आणि राज्य सरकारची सुरक्षा व्यवस्था आहे. तरीही गाडी त्यांच्या घरापर्यंत कशी पोहोचली? असा सवाल श्री. पटोले यांनी विधानसभेत केला. गाडी पोलीस सुरक्षा व्यवस्था भेदून पोहोचली, हे त्या सुरक्षा व्यवस्थेचेच अपयश आहे किंवा गाडी पोहोचावी यासाठी त्या दिवशी तेथे विशेष फट ठेवण्यात आली अशी शंका घेतली जाऊ शकते.

‘इझी मनी’ सगळय़ांनाच हवा आहे व त्यासाठी ताळतंत्र सोडायला सगळेच तयार असतात. म्हणूनच मनसुख हिरेन प्रकरणातील सत्य महाराष्ट्र एटीएसने लोकांसमोर आणायला पाहिजे. सरकारने कुणालाही पाठीशी घालू नये. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी चोवीस तासांत ‘एनआयए’ला केंद्राने घुसवले ते कशासाठी? केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे म्हणून हे घडू शकले! महाराष्ट्रासारख्या राज्यावर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव टाकण्याचाच हा प्रकार आहे. अंबानींच्या घराबाहेरील जिलेटिन ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी व त्या गाडीचा मालक मनसुख याच्या रहस्यमय मृत्यूचे प्रकरण विरोधी पक्षनेत्यांनी बऱ्यापैकी वाजवले. काही दशकांपूर्वी त्यावेळचे विरोधी पक्षनेते छगन भुजबळ यांनी किणी या इसमाच्या मृत्यूचे प्रकरण असेच रहस्यमय बनविले होते. भुजबळ तेव्हा किणी प्रकरणाचे तपास अधिकारीच झाले होते. किणी या मृताचा मेंदूही चोरण्यात आला असा भन्नाट आरोप करण्यापर्यंत किणी प्रकरण पोहोचले होते. ते प्रकरणसुद्धा पोकळ पुराव्यांवरच उभे होते व शेवटी ते कोसळून पडले. मनसुख प्रकरणाचेही तसेच घडेल.

मुंबई पोलिसांच्या तपासावर राज्याचे विरोधी पक्षनेते आक्षेप घेतात. पोलिसांचे मनोधैर्यच नष्ट करतात. हा राज्यव्यवस्थेवर दबाव आणण्याचाच प्रयत्न असतो. या दबावातूनच पोलीस व प्रशासन विरोधी पक्षनेत्यांना गुप्त माहिती पुरवत असतात. हे असे घडणे सरकारसाठी शुभसंकेत नाहीत, पण सगळय़ांनाच पाण्यात राहायचे आहे. माशाशी वैर का करायचे असे सगळय़ांनाच वाटू लागले तर राज्याचा प्रवाह गढूळ होईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘जन आशीर्वाद हा शब्द शिवसेनेचाच, भाजपने हा शब्द चोरला’, विनायक राऊतांचा राणेंवर घणाघात!

News Desk

देवेंद्र फडणवीसांच्या ‘सामना’तील मुलाखतीचा मुहूर्त लवकरच कळेल!

News Desk

लॉकडाऊन असतानाही अंत्यसंस्कारासाठी गेलेली आई आणि मुलगी कोरोना पॉझिटिव्ह

News Desk